
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची
दि. 10/12/2025
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील कोरची- कुरखेडा रस्त्यावर मंगळवारी अवघ्या काही वेळाच्या अंतराने दोन भिषण अपघात घडले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर सात – आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.
पहिला अपघात
शासकीय बस आणि सुरजागड लोह प्रकल्पाचा ट्रक यामध्ये झाला. कोरची पासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर मोहगाव वळणाजवळ दुपारी बारा ते एक च्या दरम्यान साकोली डेपो ची नियमित बस, बस क्रमांक एम एच 40 वाय 5207, कुरखेडा व्हाया कोरची जात असताना समोरून येणारा सुरजागड लोह प्रकल्पाचा कच्चा माल घेऊन रायपूरला जाणारा ट्रक, ट्रक क्रमांक एम एच 40 बीजी 90 57 यामध्ये धडक झाली. त्या बसचा समोरचा भाग चेंदामेंदा झाला. बस चालक राहुल जगबंधू वय 56 वर्ष याने सांगितले की अचानक बसचे स्टेरिंग जाम झाल्याने अपघात झाला. परिस्थिती ओळखून दुसऱ्या बाजूने उडी घेतल्याने वाहन चालक बचावला परंतु बसमधील प्रवाशांना जखमा झाल्या. बसमध्ये एकूण बारा प्रवासी होते. त्यातील तीन महिला जखमी झाल्या . कमलाबाई मडावी वय 56 राहणार नकटी तालुका देवरी, गंभीर जखमी असून गडचिरोलीच्या सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. लता वट्टी वय 23 राहणार मसली हे जखमी, ललिता भक्ता वय 30 राहणार कोचीनारा जखमी.


दुसरा अपघात
अवैद्य खाजगी मॅक्स पलटी ग्रामसेवकाचा मृत्यू .
कोरची पासून सुमारे चार किलोमीटर अंतरावरील बेळगाव येथे जिल्हा परिषद शाळेसमोर दुपारी दोन तीन च्या दरम्यान खाजगी मॅक्स पलटी झाली खाजगी मॅक्स वाहन क्रमांक एम एच 22 डी 1990 . हे वाहन कोरची वरून कुरखेडा ला 14 -15 प्रवासी घेऊन जात होते. चालक व्यंकट नानाजी सीडाम वय 52 राहणार मालदुगी तालुका कुरखेडा यांनी सांगितले की स्टेरिंग फ्री झाल्याने गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी पलटी झाली. या अपघातात दिलीप रामचंद्र धाकडे वय ४९ वर्षे ग्रामसेवक अली टोला, मूडगाव बौद्ध विहार, गांधीनगर, गडचिरोली यांचा जागीच मृत्यू झाला. उज्वला आदेश राऊत वय 25 वर्षे राहणार मसेली गंभीर जखमी असून गडचिरोली जिल्हा रुग्णाण्यात रेफर करण्यात आले .मंगली बाई गुरुभिले वय 45 वर्षे राहणार जामणारा तालुका कोरची जखमी, चालक व्यंकट सिडाम जखमी.सर्व जखमांवर ग्रामीण रुग्णालय कोरची येथे प्राथमिक उपचार डॉ. हर्षा उईके यांनी केले.

महत्त्वाचे म्हणजे या मॅक्स ची कोणतेही कागदपत्र नव्हती, परवाना इन्शुरन्स काहीच नव्हते, गाडी एक्स्पायर्ड झाली आहे.चालक व्यंकट शिडाम यांनी उघडपणे सांगितले पोटापाण्याचा प्रश्न आहे म्हणून ही गाडी चालवितो. पोलिसांना दरमहा हप्ता देतो, त्यामुळे गाडी पकडली जात नाही. कोरची – कुरखेडा मार्गावर अशा बऱ्याच अवैध, बेकायदा प्रवासी वाहनांचा सुळसुळाट वाढला असून प्रशासन मात्र डोळे झाक करून आहे. गाडीचा विमा असता तर मृत्यूच्या नातेवाईकांना आर्थिक सहायता मिळाले असते .अशा विना इन्शुरन्सच्या गाड्या चालवण्यास बंदी टाकावी अशी मागणी जनतेने केलेली आहे. दोन्ही अपघाताची नोंद पोलीस स्टेशन कोरची येथे झाली असून पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे तपास करीत आहेत

