
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची येथे कृषी विभाग व पाणी फाऊंडेशनतर्फे फार्मर कप शेतकरी प्रशिक्षण आणि जागतिक मृदा दिन उत्साहात साजरा
सामुहिक प्रयत्नातून शेती समृद्ध करण्यासाठी पाणी फाऊंडेशनने सुरू केलेल्या ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ स्पर्धेत तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व आपली शेती समृद्ध करावी, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी नागेश मिसाळ यांनी केले.
कृषी विभाग महाराष्ट्र शासन, तालुका कृषी अधिकारी कार्यालय कोरची आणि पाणी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक तहसील कार्यालयाच्या सभागृहात ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ बाबत एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण आणि ‘जागतिक मृदा दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
गट शेती बदल उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना नागेश मिसाळ म्हणाले की, “हवामान बदल आणि अनिश्चित पाऊस यामुळे शेती क्षेत्र आव्हानात्मक झाले आहे. यावर मात करण्यासाठी ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ हे एक प्रभावी माध्यम आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी गटशेतीकडे वळावे आणि शेती ही गटाच्या माध्यमातून करावी.

जमिनीची सुपीकता हीच खरी संपत्ती
जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून मिसाळ यांनी माती परीक्षणाचे महत्त्व विशद केले. “रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडत चालला आहे. शाश्वत उत्पादनासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवणे आवश्यक असून, शेतकऱ्यांनी माती परीक्षण करूनच खतांचे नियोजन करावे,” असे आवाहन त्यांनी केले.
प्रशिक्षणात या विषयांवर चर्चा
या एक दिवसीय प्रशिक्षणात पाणी फाऊंडेशनच्या प्रतिनिधींनी ‘फार्मर कप’ स्पर्धेचे नियम व कालावधी, गुणदान पद्धती याबद्दल तांत्रिक माहिती दिली. तसेच कृषी विभागाच्या वतीने महाडीबीटी पोर्टलवरील योजनांची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाला तालुक्यातील विविध गावांतील सरपंच, पोलीस पाटील, कृषी मित्र, कृषी ताई, प्रगतशील शेतकरी तसेच कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागेश मिसाळ तालुका कृषी अधिकारी यांनी केले तर आभार ईश्वर पाथोडे यांनी मानले.

