
Maratha Andolan : सरकारने वेळीच तोडगा काढला नाही तर परिस्थिती होणार भयावह!
न्युज जागर विशेष – मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मोठ्याप्रमाणात मोर्चेकरी आझाद मैदान आणि आसपासच्या परिसरात जमा झाले आहे. वाहनांसह मुंबईत आलेल्या या मोर्चेकऱ्यांनी काही सुविधा अभावी रस्त्यावरच लघुशंका आणि इतर विधी आटोपून घेतल्याने तसेच कचरा केल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात रात्री आणि सकाळी दुर्गंधीचे साम्राज्य पसरले होते.मात्र, महापालिका प्रशासनाने परिमंडळ एकमधील सफाई कामगारांची मदत घेऊन हा परिसर स्वच्छ केला आणि पावडर तसेच धुम्र फवारणी करत निर्जंतुक करण्याचा प्रयत्न केला. पण हे आंदोलन पुढे काही दिवस असेच सुरु राहिल्यास आणि अधिकाधिक मोर्चेकरी सहभागी होऊ लागल्यास त्यांना सुविधा पुरवणे कठीण होऊन मुंबईत भयावह परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Maratha Andolan)
मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्याप्रमामाण वाहनांमधून मराठा समाजाचे आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. या आंदोलकांनी आपली वाहने जे. जे. पुलापासून पुढे मंत्रालयापर्यंत आणि पोलिस मुख्यालयापासून थेट हुतात्मा चौक आणि आसपासच्या भागांमध्ये पार्क केली आहेत. या टेम्पो, ट्रक आणि जिपमधून आलेल्या वाहनांमध्ये गाद्यांची सुविधा असून काहींनी तर गॅस सिलेंडर आणि शेगडी आणून आपले जेवण स्वत: शिजवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हे आंदोलक पूर्णपणे पुढील काही दिवस मुक्काम करण्याच्या उद्देशाने आल्याचे बोलले जात आहे. (Maratha Andolan)
या आंदोलकांनी पदपथांना वाहने जोडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची प्रशासकीय इमारत आणि रेल्वे स्थानकाच्या शेजारील पदपथ अडवून तिथे पथारी पसरवलेली आहे. त्यामुळे एकप्रकारे या पदपथांवर तंबू ठोकत त्यांनी शड्डू ठोकला आहे. या मोर्चाला एक दिवसांची परवानगी आणि ५ हजार लोकांना परवानगी गृहीत धरुन महापालिकेने यासाठीची आवश्यक सेवा सुविधा पुरवली होती, परंतु प्रत्यक्षात मोर्चेकऱ्यांची संख्या सुमारे २० हजारांहून अधिक असल्याने या उपलब्ध करून दिलेल्या सेवेवर ताण आल्याने संध्याकाळपासून शौचालय, पिण्याच्या पाण्याचे टँकर, इतर वापरासाठीच्या पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका, वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली. तसेच यासर्वांकडून बहुतांशी ठिकाणी कचरा झाल्यामुळे महापालिकेच्या ए विभागाच्या सफाई कामगारांच्या मदतीने सफाई केली. परंतु यासाठी ही कुमक कमी पडत असल्याने इतर तीन विभागांमधून सफाई कामगारांची तसेच स्वयंसेवी संस्थांच्या कंत्राटी कामगारांची मदत घेऊन या परिसरातील कचऱ्याची स्वच्छता करण्यात आली आहे. (Maratha Andolan)

सुरुवातीला मर्यादीत शौचालयांची सुविधा असल्याने आंदोलकांनी मिळेल तिथे मोकळया जागेत लघुशंका करण्यास तसेच काहींनी इतर विधीही उरकून घेतल्याने या परिसरात एकप्रकारे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले होते. परंतु येत्या काही दिवसांमध्ये आंदोलनात सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून तसे झाल्यास मुंबईकरांना अधिक मनस्ताप होऊन परिस्थिती भयावह होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Maratha Andolan)

