
जिल्हा महिला व बाळ रुग्णालयात प्रस्तुतीपूर्व कक्षात नातेवाईकांची गर्दी, रुग्ण त्रस्त.
गडचिरोली – जिल्हा महिला व बाळ रुग्णालय हे जिल्ह्यातील सर्वात मोठे व महत्त्वाचे आरोग्य केंद्र मानले जाते. दररोज शेकडो गर्भवती महिला येथे उपचारासाठी दाखल होतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयातील प्रस्तुतीपूर्व कक्षात नातेवाईकांची प्रचंड गर्दी होत असून, यामुळे रुग्ण व त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर-नर्स यांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
रुग्णालयातील नियमावलीनुसार या कक्षात रुग्णांबरोबर फक्त मर्यादित नातेवाईकांना प्रवेश असावा. तरीदेखील, प्रशासनाकडून योग्य देखरेख नसल्यामुळे दहा-दहा लोक एकाचवेळी आत प्रवेश करतात. त्यामुळे आधीच तणावाखाली असलेल्या गर्भवती महिलांना हवा कमी मिळणे, गोंधळ, तसेच गोपनीयतेचा अभाव यांसारखे त्रास सहन करावे लागत आहेत.

आरोग्यसेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही रुग्णसेवेवर लक्ष केंद्रित करण्यात अडथळे येत असल्याची माहिती समोर आली आहे. काही वेळा आवश्यक उपकरणे व बेडपर्यंत पोहोचणे अवघड होते, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. या अव्यवस्थेबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, रुग्णालय प्रशासनाने गर्दी नियंत्रणासाठी कोणतेही ठोस पावले उचललेली नाहीत. “आम्ही आमच्या मुली-बहिणींना सुरक्षिततेसाठी रुग्णालयात आणतो, पण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्यांनाच जीवघेणा त्रास सहन करावा लागत आहे,” असे नागरिकांनी सांगितले.
नागरिकांची मागणी आहे की रुग्णालय प्रशासनाने तातडीने या खालील बाबीकडे लक्ष द्यावे.
नातेवाईकांसाठी स्वतंत्र प्रतीक्षा कक्षाची सोय करावी,
सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करून रुग्णालयातील शिस्त राखावी,
जेणेकरून रुग्णांना योग्य उपचार आणि आरामशीर वातावरण मिळेल.

