
सोनू वाळके,जिल्हाप्रतिनिधी, गडचिरोली.
चंद्रपूर :-मूल, आकापूर येथील औद्योगिक विकास महामंडळ परिसरातील एच.पी. गॅस कंपनीच्या गोडाऊनमध्ये मंगळवारी (दि. २६) गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत ६ राजस्थानी कामगार गंभीर जखमी झाले. या घटनेची सखोल चौकशी करण्याची आणि दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. भीम आर्मी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष जितेंद्र डोहणे यांनी मूल येथील पत्रकार परिषदेत मागणी केली. त्यांनी शुक्रवारी (दि. २९) या मागणीचे निवेदन मूल पोलिस स्टेशनला सादर केले.
मूलमध्ये संजय प्लेम एजन्सी या नावाने एचपी गॅस कंपनीचे अधिकृत सिलिंडर विक्रेता आहे. कंपनीचे गोडाऊन आकापूर येथिल महाराष्ट औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीत आहे. मंगळवारी (दि. २६) एका गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात ६ राजस्थानी कामगार गंभीर जखमी झाले. त्यांना चंद्रपूर येथे खासगी रूग्णालयात हलविले. या दुर्घटनेबाबतची माहिती गोपनीय ठेवल्या गेली. त्यामुळे ही बाब संशयास्पद असून

फार मोठे गौडबंगाल दडले असल्याचे भीम आर्मीने म्हटले आहे. सिलिंडरचे कवच मजबूत आणि ठणक असते. कंपनीचे सील सुद्धा अंत्यत मजबूत असते. जमिनीवर पडल्याने स्फोट झाला, असे म्हणणे वितरकाच्या संचालकाचे हास्यास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गोडाऊनमध्ये सिलिंडरमधील गॅसची चोरी करण्यात येत होती असे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यातून हा स्फोट झाला असे बोलल्या जात आहे. त्यामुळे कपंनीच्या गोडाऊनला सीलबंद करून या दुर्घटनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी भीम आर्मी संघटनेने केली आहे. पत्रकार परिषदेला सामाजिक कार्यकर्ते सुजीत खोब्रागडे, अमर घोंगडे, भयाजी मानकर, अजय रंगारी, प्रणय रायपूरे आदी उपस्थित होते.

