
१०२ जणांची आरोग्य तपासणी; ५० जणांचे रक्तदान, १५ जणांची अवयवदानासाठी नोंदणी
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली, दि. २२ सप्टेंबर : ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे आज आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी, स्वेच्छा रक्तदान आणि प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराला अधिकारी-कर्मचारी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात एकूण १०२ जणांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला, तर ५० जणांनी स्वेच्छेने रक्तदान केले.

आरोग्य तपासणीदरम्यान आवश्यकतेनुसार विविध तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये ५३ जणांची ईसीजी, ५८ जणांची रक्त तपासणी आणि ४८ जणांची सिकलसेल तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये ५ जण पूर्वीपासून उच्च रक्तदाबाने ग्रस्त असल्याचे, तर ८ जणांमध्ये उच्च रक्तदाबाचा संशय आढळून आला. त्याचप्रमाणे ५ जण पूर्वीपासून मधुमेहाने ग्रस्त असल्याचे, तर ४ जणांमध्ये मधुमेहाचा संशय आढळला. दोन जणांना पूर्वीपासून उच्च रक्तदाब व मधुमेह हे दोन्ही आजार असल्याचे, तर अन्य दोन जणांमध्ये या दोन्ही आजारांचा संशय आढळून आला. एका महिलेची स्तन कर्करोगविषयक तपासणीही करण्यात आली.
शिबिरात आरोग्य तपासणीसोबत विविध आरोग्य व सामाजिक योजनांबाबतही जनजागृती करण्यात आली. यावेळी १५ जणांनी अवयवदानासाठी नोंदणी केली, तर ५ लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड तयार करण्यात आले. रक्तदान शिबिरात ४९ पुरुष व एका महिलेसह एकूण ५० जणांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.
या कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रसाद घाडगे, उपजिल्हाधिकारी स्मिता मोरे व स्मिता बेलपत्रे, तहसीलदार संतोष आष्टीकर व संजय जयस्वाल यांच्यासह महसूल, आरोग्य तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

