
अनखोडा येथील नायरा पेट्रोल पंपाजवळील घटना; एकुलत्या एक मुलाच्या निधनाने चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर
चामोर्शी(आष्टी)२२ सप्टेंबर : तालुक्यातील अनखोडा येथील नायरा पेट्रोल पंपासमोर रात्रीच्या गस्तीचे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने २१ वर्षीय सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (ता. २२) रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. युवराज अविनाश चौधरी (वय २१, रा. आष्टी, ता. चामोर्शी) असे मृतकाचे नाव आहे. या घटनेमुळे आष्टी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
युवराज चौधरी हा कोनसरी येथील लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या आर. के. पी. व्ही. कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. कंपनीकडून त्याची अनखोडा येथील नायरा पेट्रोल पंपासमोर रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत सुरक्षा कर्तव्यावर नियुक्ती करण्यात आली होती.

मंगळवारी रात्री कर्तव्यावर असताना युवराजला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी राजेंद्र कोवे यांनी घटनेची माहिती पर्यवेक्षक करण येलमुले यांना दिली. माहिती मिळताच करण येलमुले यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत युवराजला उपचारासाठी आष्टी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
युवराज हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या आकस्मिक निधनाने चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील आणि एक बहीण असा परिवार आहे. या घटनेने आष्टीतील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
दरम्यान, या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. युवराजच्या कुटुंबीयांना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी, कोनसरी यांच्याकडून आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी आष्टी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

