
पदवीधर-शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; २७ ऑक्टोबरला मतमोजणी, आचारसंहिता लागू
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेतील पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, राज्यातील संबंधित मतदारसंघांमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान, तर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.
या निवडणुकीत औरंगाबाद विभाग पदवीधर, पुणे विभाग पदवीधर, नागपूर विभाग पदवीधर, अमरावती विभाग शिक्षक आणि पुणे विभाग शिक्षक या पाच मतदारसंघांचा समावेश आहे. विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी संपुष्टात येणार असल्याने त्यापूर्वी नवीन सदस्यांची निवड करण्यासाठी ही निवडणूक घेण्यात येत आहे. #newsjagar

२९ सप्टेंबरला अधिसूचना
निवडणूक कार्यक्रमानुसार २९ सप्टेंबर २०२६ रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर असून, ७ ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ९ ऑक्टोबर २०२६ आहे.
यानंतर २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून, २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
निवडणूक जाहीर होताच आचारसंहिता लागू
भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून संबंधित पाचही मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसह विधान परिषद निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहितेच्या तरतुदी लागू करण्याबाबत आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे. Election bugle sounded for five Legislative Council seats; voting on October 23.
निवडणुकीच्या घोषणेमुळे संबंधित मतदारसंघांमध्ये राजकीय हालचालींना वेग येणार असून, इच्छुक उमेदवारांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. आता उमेदवारी अर्ज, छाननी आणि माघारीनंतर अंतिम रिंगणात किती उमेदवार राहतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

