
तालुका मुक्तिपथ समितीची आढावा बैठक संपन्न
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी| गडचिरोली
चामोर्शी : जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या आदेशानुसार चामोर्शी तहसील कार्यालयात तहसीलदार तथा तालुकादंडाधिकारी प्रशांत घोरूडे यांच्या अध्यक्षतेखाली तालुका मुक्तिपथ समितीची आढावा बैठक घेण्यात आली. तालुक्यातील अवैध दारूविक्री, ड्रग्ज व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने प्रभावी कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले.

नगरपंचायत व ग्रामपंचायत क्षेत्रातील शासकीय कार्यालये, शाळा तसेच सार्वजनिक ठिकाणांच्या १०० यार्ड परिसरातील पानठेले हटवून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच किराणा दुकानांमधून होणारी तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री थांबविण्यासाठी संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या.
शाळा व महाविद्यालयांमध्ये तंबाखूमुक्त जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असून, शाळेतील तंबाखू सेवन करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करून नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला देण्यात आले. या कारवाईचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यासही सांगण्यात आले.
चामोर्शी शहरातील वाळवंटी चौक व आष्टी रोड परिसरातील अवैध दारू व ड्रग्ज विक्रीवर कारवाई करण्यासाठी सर्व विभागांनी तसेच पोलिसांनी समन्वयाने कार्यवाही करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. गावपातळीवरील ठोक दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई करून त्याचा अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले.
तंटामुक्ती समिती व पोलीस पाटील यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून, गावामध्ये अवैध दारूला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायत समित्या अधिक सक्रिय करण्याच्या सूचना ग्रामविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना दिल्या. तीन महिन्यांनंतर याबाबतचा अहवाल सादर केला जाणार आहे.
जंगलातील अवैध दारूभट्ट्या नष्ट करण्यासाठी तसेच जंगलतोड रोखण्यासाठी वनपाल व वनविभागाने समन्वयाने मोहीम राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. ‘उमेद’ अभियान व ‘माविम’च्या माध्यमातून तंबाखू व दारूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे.
महिलांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्याचे ठरले. तसेच गरोदर व स्तनदा मातांना बालकांमधील कर्करोगाच्या धोक्याबाबत माहिती देण्यासाठी आशा कार्यकर्त्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या व्यसनाधीन रुग्णांना मुक्तिपथ तालुका विलगीकरण केंद्रामध्ये समुपदेशनासाठी पाठविण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
बैठकीस तहसीलदार प्रशांत घोरूडे, पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. आशुतोष पाटील, नगरपंचायतीचे कर निरीक्षक मुरलीधर ठेंगरे, समुपदेशक पुरुषोत्तम घ्यार, राजेंद्र बल्लीवार, श्रीदेवी पुप्पालवार, डॉ. राजेश गजभे, मुक्तिपथचे तुषार येरेमळ, संघटक आनंद इंगळे, उपसंघटक आनंद सिडाम, विनोद पांडे, बाळोले, राजश्री रामटेके, पौर्णिमा खोब्रागडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

