
वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने दुरुस्तीचे निर्देश; राष्ट्रीय महामार्ग विभागाला स्पष्ट सूचना
नितेश गट्टीवार |जिल्हा प्रतिनिधी|
गडचिरोली (कुरखेडा), दि. १८ सप्टेंबर: कुरखेडा ते कोरची राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक, प्रवासी तसेच नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याची झालेली दुरवस्था लक्षात घेऊन आमदार रामदास मसराम यांनी शुक्रवारी या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.

पाहणीदरम्यान आमदार मसराम यांनी महामार्गावरील खड्डे, खराब झालेला रस्त्याचा भाग तसेच वाहतुकीस निर्माण होणाऱ्या अडचणींची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी वाहनचालक व स्थानिक नागरिकांकडूनही रस्त्याच्या दुरवस्थेबाबत माहिती जाणून घेतली.
कुरखेडा–कोरची मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. नागरिकांच्या जीविताची सुरक्षितता लक्षात घेता रस्त्याची तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे आहे, असे आमदार मसराम यांनी स्पष्ट केले.
यानंतर आमदार रामदास मसराम यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावेत, खराब झालेल्या भागाची आवश्यक दुरुस्ती करावी आणि वाहतूक सुरक्षित राहण्यासाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशा स्पष्ट सूचना दिल्या.
नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित असलेल्या या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून विलंब न करता प्रत्यक्ष कार्यवाही करावी, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देशित केले.
दरम्यान, कुरखेडा–कोरची मार्गाच्या दुरवस्थेबाबत आमदारांनी प्रत्यक्ष पाहणी केल्याने प्रवासी व वाहनचालकांच्या समस्येला आता प्रशासनाकडून तातडीने प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
यावेळी युवक काँग्रेस कमिटी विधानसभा अध्यक्ष कमलेश बारस्कर उपस्थित होते.

