
शिवाजी हायस्कूलच्या मैदानावर खेळाडूंच्या दमदार सामन्यांना सुरुवात
जिल्हा प्रतिनिधी |गडचिरोली
चामोर्शी,दि.१९ सप्टेंबर :चामोर्शी येथील शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात तालुकास्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेचा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. या स्पर्धेचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य अजय लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले.

कबड्डी हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विशेष लोकप्रिय असलेला खेळ असून, या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या क्रीडागुणांचे प्रदर्शन करण्याची तसेच तालुकास्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्याची संधी मिळत आहे. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मैदानावर उपस्थित खेळाडू आणि क्रीडाप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना अजय लोंढे यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. नियमित सराव, शिस्त, संघभावना आणि जिद्द या गुणांच्या बळावर खेळाडूंनी आपली क्रीडाक्षमता विकसित करावी, असे त्यांनी सांगितले. विजय-पराजयापेक्षा खेळातून मिळणारा अनुभव आणि आत्मविश्वास अधिक महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत १४ वर्ष वयोगटातील २३ मुलामुलींच्या विविध संघांतील खेळाडू सहभागी झाले असून, मैदानावर चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. खेळाडूंनी उत्कृष्ट चढाया, पकडी आणि बचावाचे कौशल्य दाखवत सामन्यांमध्ये रंगत आणली. त्यामुळे स्पर्धेच्या ठिकाणी क्रीडाप्रेमी आणि विद्यार्थ्यांची उपस्थितीही लक्षणीय होती.
कार्यक्रमास उपप्राचार्य श्याम भर्रे, तालुका समन्वयक राकेश खेवले, क्रीडा शिक्षक कालिदास बन्सोड, मनोज बोमनवार, संजय आलेवार, वेलादी सर,मंडल सर,सचिन सोमणकर, सचिन चालख, सुरज सोयाम, तनमय चलाख,वैष्णव किनेकर, प्रविण धोटे, हर्षला बुरांडे, कुणाल बोरकुटे, साहिल खिओले, अनिकेत पाल, मेघराज बोधलकर, राकेश धोटे, निशांत लाकडे, विशाल अत्राम, कृष्ण वारजुरकर, कार्तिक चौके, राकेश वासेकर, योगेश सोयाम, ओंकार कडसकर, सुरज कोसामशिले आदी उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा शिक्षक, शिक्षकवृंद तसेच संबंधित आयोजकांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या तालुकास्तरीय स्पर्धेमुळे चामोर्शीच्या क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

