
नगराध्यक्षा प्रणोतीताई निंबोरकरांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोलीत विविध सामाजिक उपक्रमांची पर्वणी
नितेश गट्टीवार| जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली, दि. १९ सप्टेंबर : गडचिरोली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ॶॅड. प्रणोतीताई सागर निंबोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज शनिवार, दि. १९ सप्टेंबर रोजी शहरात विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता ‘सेवा, माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी’ या भावनेतून हा दिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.

या सेवाकार्याची सुरुवात सकाळी १० वाजता जवाहरलाल नेहरू शाळा, नगर परिषद येथे विद्यार्थ्यांना नोटबुक वाटपाने होणार आहे. त्यानंतर १०.२० वाजता राजीव गांधी शाळेत विद्यार्थ्यांना नोटबुकचे वाटप करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांना हातभार लावण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
सकाळी १०.४० वाजता पंचवटी नगर येथील शिवमंदिर परिसरात रक्त तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य तपासणीसोबतच रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येणार आहे.
यानंतर सकाळी ११ वाजता अंप्रें विद्यालय, लांझेडा येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात येणार असून, ११.३० वाजता इंदिरा गांधी चौक येथील रेस्ट हाऊस परिसरात आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
दरम्यान, या सेवाभावी उपक्रमांमधील विशेष आकर्षण ठरणारा ‘माणुसकीचा घास’ हा उपक्रम दुपारी १२ वाजता महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला आहे.
या माध्यमातून रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच गरजू नागरिकांना अन्नवाटप करण्यात येणार आहे.
शिक्षणापासून आरोग्यापर्यंत आणि रक्तदानापासून अन्नदानापर्यंत विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून नगराध्यक्षा प्रणोतीताई निंबोरकर यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला जाणार आहे.
‘वाढदिवसाचा आनंद सेवाकार्यातून साजरा करूया’ हा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे.
या सर्व उपक्रमांमध्ये शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सेवाकार्यात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टी, गडचिरोली शहराच्या वतीने करण्यात आले आहे.
सेवेचे वेळापत्रक
सकाळी १०.०० वा. – जवाहरलाल नेहरू शाळा : नोटबुक वाटप
सकाळी १०.२० वा. – राजीव गांधी शाळा : नोटबुक वाटप
सकाळी १०.४० वा. – पंचवटी नगर, शिवमंदिर : रक्त तपासणी व रक्तदान शिबिर
सकाळी ११.०० वा. – अंप्रें विद्यालय, लांझेडा : खाऊ वाटप
सकाळी ११.३० वा. – इंदिरा गांधी चौक, रेस्ट हाऊस : आरोग्य तपासणी शिबिर
दुपारी १२.०० वा. – महिला व बाल रुग्णालय : ‘माणुसकीचा घास’ अन्नवाटप

