
एटापल्ली : ग्रामपंचायत गटटा अंतर्गत येणाऱ्या गुळुंजूर येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या दूर करून अध्यापन सुरळीत करण्यासाठी तातडीने नवीन नियमित शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. गुळुंजूर येथील गावकरी व पालकांसोबत CPIच्या वतीने गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यात आले.
गुळुंजूर हे दुर्गम भागातील गाव असून येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शाळेत आवश्यक शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन, अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि शैक्षणिक गुणवत्ता यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने नवीन नियमित शिक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच नवीन शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत विद्यार्थ्यांचे अध्यापन सुरळीत राहण्यासाठी तात्पुरती पर्यायी शिक्षक व्यवस्था करण्यात यावी. शाळेतील शैक्षणिक परिस्थितीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.

कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले, “दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षणाच्या समान संधी मिळणे आवश्यक आहे. शिक्षकांची कमतरता राहिल्यास विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम, शैक्षणिक प्रगती आणि भविष्यातील संधी यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गुळुंजूर जिल्हा परिषद शाळेतील शैक्षणिक समस्या तातडीने सोडवून नवीन नियमित शिक्षकाची नियुक्ती करावी.”
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन नवीन नियमित शिक्षक उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी CPIच्या वतीने करण्यात आली आहे. मागणीवर कार्यवाही न झाल्यास गावकरी व पालकांना सोबत घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
यावेळी CPIचे गडचिरोली जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सदस्य कॉ. सुरज जककुलवार तसेच गुळुंजूर येथील गावकरी व पालक उपस्थित होते.

