
ग्रामस्थांची दर्शनासाठी अलोट गर्दी; वन विभाग व गावकरी यांच्यातील बंध अधिक दृढ
सिरोंचा : निसर्गाच्या कुशीत वसलेल्या झिंगानूर येथील वन वसाहतीमध्ये यंदाचा श्री गणेशोत्सव अत्यंत भक्तिमय, उत्साही आणि निसर्गपूरक वातावरणात साजरा होत आहे. “पर्यावरण रक्षण हीच खरी ईश्वरसेवा” हा संदेश देत वन विभागाच्या वतीने श्री गणेशाची मंगलमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली असून, संपूर्ण परिसरात भक्ती आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे.
ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व भाविक दर्शनासाठी लीन:
वन वसाहतीमध्ये बसविण्यात आलेल्या या विघ्नहर्त्या श्री गणेशाच्या दर्शनासाठी केवळ वन विभागाचे कर्मचारीच नव्हे, तर झिंगानूर व परिसरातील गावातील नागरिक, महिला, वृद्ध व बाल गोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेत आहेत. रोज सायंकाळी होणाऱ्या आरतीच्या वेळी संपूर्ण मंडप भाविकांच्या गर्दीने आणि “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषाने दुमदुमून जात आहे. या उत्सवामुळे वन विभाग आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्यातील नाते अधिक घट्ट व आपुलकीचे बनले आहे.
शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व निसर्गरम्य सजावट:
पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने यंदा पूर्णपणे पर्यावरणपूरक शाडू मातीची गणेशमूर्ती बसविण्यात आली आहे. वसाहतीतील गणेश मंडपात नैसर्गिक फुले, आकर्षक रोषणाई आणि पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून अत्यंत देखणी सजावट करण्यात आली आहे.
वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन:
वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत नरेंद्र खैरनार यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली या उत्सवाचे नेटके आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की, “गणेशोत्सव हा सर्वांना एकत्र जोडणारा सण आहे. वन वसाहतीत स्थापन झालेला हा गणेशोत्सव ग्रामस्थ आणि वन विभाग यांच्यात सुसंवाद व सहकार्य वाढवणारा ठरत आहे. या निमित्ताने वनांचे व वन्यजीवांचे रक्षण करण्याचा संकल्प आपण सर्वांनी मिळून अधिक दृढ केला पाहिजे.”
कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग:
आयोजनाच्या यशस्वीतेसाठी वनपाल बी. के. निमगडे, बी. डी. रामपुरकर व पी. के. मरापे यांनी पुढाकार घेऊन सर्व व्यवस्थापन सांभाळले आहे.
तसेच वनरक्षक व्हि. एस. शेट्टीवार, एस. एन. वाढई, ए. डी. आचला, टी. एम. सोनजल आणि जी. एच. टेकाम यांनी मंडप उभारणी, विद्युत रोषणाई व येणाऱ्या भाविकांच्या नियोजनाची जबाबदारी चोख बजावली.
महिला कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान:
या गणेशोत्सवात महिला वन कर्मचाऱ्यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला आहे. महिला वनरक्षक कु. पी. व्ही. पोटावी, कु. ए. के. खुरसे, कु. आर. आर. कोरामी, कु. बी. पी. धुर्वे व कु. पी. एल. आत्राम यांनी पूजाविधी, रांगोळी सजावट, महाप्रसाद वाटप आणि दैनंदिन आरतीच्या व्यवस्थेत हिरीरीने सहभाग नोंदवून उत्सवाची शोभा द्विगुणीत केली आहे.
विविध उपक्रम व महाप्रसाद:
उत्सवाच्या काळात दररोज संध्याकाळी महाआरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असून, ग्रामस्थ व कर्मचाऱ्यांसाठी हे स्नेहमिलनाचे मुख्य केंद्र ठरले आहे. यासोबतच वन विभागाच्या वतीने उपस्थितांना पर्यावरण संवर्धन, जंगल बचाव आणि वणवा नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करून जनजागृती केली जात आहे.


