
प्रशासनाची मदत पोहोचण्यापूर्वी नागरिकांनी धाव घेत केली बचावकार्य; सव्वातीन वाजता पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली,दि.१८ सप्टेंबर: गडचिरोली–चामोर्शी महामार्ग क्रमांक ३५३ (सी) वर शुक्रवारी, दि. १८ सप्टेंबर रोजी दुपारी पावणेतीन वाजताच्या सुमारास नवीन पुलियाच्या कडेला एसटी बस पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात बसमधील काही प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील गावकऱ्यांसह महामार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाची मदत पोहोचण्यापूर्वीच नागरिकांनी बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू केले. त्यामुळे जखमी प्रवाशांना तातडीने मदत मिळण्यास सुरुवात झाली.
दरम्यान, महेंद्र ब्राह्मणवाडे यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्यांनी पोलीस प्रशासनाला घटनेची माहिती दिली.
यानंतर सव्वातीन वाजताच्या सुमारास पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. तसेच रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहोचल्या. जखमी प्रवाशांना तातडीने जिल्हा गडचिरोली रुग्णालयात हलवून उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघात नेमका कशामुळे झाला, बसमध्ये एकूण किती प्रवासी होते आणि किती प्रवासी जखमी झाले, याबाबत अधिकृत माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. अपघातानंतर महामार्गावर नागरिकांची गर्दी झाल्याने काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला.
शिवनीच्या नवीन पुलियाजवळ झालेल्या या अपघाताची गंभीर दखल घेऊन संबंधित यंत्रणेने रस्त्याची सुरक्षितता, पुलियाच्या कडेला असलेली परिस्थिती आणि अपघाताची कारणे तपासावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

