
नवीन कार्यकारिणीसह उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा होणार सन्मान
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटना, गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी भव्य जिल्हास्तरीय आमसभेचे आयोजन करण्यात आले आहे. परिचारिकांच्या विविध प्रलंबित मागण्या, सेवाविषयक अडचणी आणि संघटनात्मक प्रश्नांवर या आमसभेत सविस्तर चर्चा होणार असून, जिल्ह्यातील परिचारिकांच्या प्रश्नांना एकजुटीने आवाज देण्यासाठी या आमसभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

ही आमसभा पंचायत समिती सभागृह, धानोरा रोड, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांमध्ये कार्यरत परिचारिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या व मागण्या मांडाव्यात, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रलंबित मागण्यांवर होणार सविस्तर चर्चा
परिचारिकांच्या सेवेशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न, कामकाजातील अडचणी, सेवा-सुविधा आणि हक्काच्या मागण्यांवर आमसभेत सखोल विचारमंथन करण्यात येणार आहे. तसेच राज्यस्तरावर प्रलंबित असलेल्या प्रश्नांना शासनदरबारी प्रभावीपणे मांडण्यासाठी पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.
नवीन कार्यकारिणीची निवड; उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सन्मान
या जिल्हास्तरीय आमसभेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे संघटनेच्या नवीन जिल्हा कार्यकारिणीची निवड व घोषणा केली जाणार आहे. यासोबतच परिचारिका क्षेत्रात उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार समारंभही आयोजित करण्यात आला आहे.
संघटनेच्या माजी जिल्हाध्यक्षा श्रीमती माया सिरसाठ यांनी जिल्ह्यातील सर्व परिचारिकांना एकजुटीने आमसभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
“परिचारिकांचा हक्क… सुरक्षित सेवा… सशक्त संघटना…” हा नारा घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या आमसभेत जिल्ह्यातील परिचारिकांची मोठी उपस्थिती राहण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. आपल्या सेवेशी निगडित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आणि संघटनेची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी ही आमसभा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

