
साडेसात तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम हडपल्याचा आरोप; चामोर्शी पोलिसांत गुन्हा दाखल
जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली
चामोर्शी : ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाने एका २८ वर्षीय तरुणाच्या आयुष्याला आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मोठा धक्का बसल्याची धक्कादायक घटना चामोर्शी परिसरात समोर आली आहे. ऑनलाइन गेमिंगमध्ये तब्बल ३५ ते ४० लाख रुपये गमावल्यानंतर, आर्थिक अडचणी भरून काढण्यासाठी नातेवाईकाच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रकमेवर डल्ला मारल्याचा आरोप संबंधित तरुणावर करण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर JCB मशीनही परस्पर विकल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी चामोर्शी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

इंजिनिअरिंगच्या शिक्षणादरम्यान लागले गेमिंगचे व्यसन
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील पारवा येथील रहिवासी आदित्य रविकिरण यमसनवार (२८) हा यवतमाळ येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता.
याच काळात त्याला ऑनलाइन गेमिंगची सवय लागली. कालांतराने या व्यसनाचे रूपांतर मोठ्या आर्थिक नुकसानीत झाले आणि त्याने ऑनलाइन गेमिंगमध्ये ३५ ते ४० लाख रुपये गमावल्याचे तपासात समोर आल्याचे सांगण्यात येते.
कुटुंबीयांनी त्याला या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मे २०२१ मध्ये चामोर्शी येथील नातेवाईकाकडे पाठविले. संबंधित नातेवाईक सरकारी कंत्राटदार असून त्यांनी आदित्यला चांदापूर फाटा येथील साईट कार्यालयात कामाची देखरेख आणि कामकाज शिकण्याची जबाबदारी दिली होती.
विश्वासाला तडा; घरातील दागिने गायब
नातेवाईकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून आर्थिक व्यवहाराशी संबंधित काही जबाबदाऱ्याही सोपवल्या होत्या. मात्र काही काळानंतर घरातील तसेच कार्यालयातील आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता जाणवू लागल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
११ जानेवारी २०२३ रोजी फिर्यादीच्या आईचे निधन झाले. त्यानंतर घरातील तिजोरीची पाहणी केली असता दिवंगत आई, पत्नी आणि सासू यांच्या वापरातील तसेच तिजोरीत ठेवलेले मिळून सुमारे साडेसात तोळे सोन्याचे दागिने गायब असल्याचे आढळले.
कुटुंबीयांनी चौकशी केल्यानंतर हे दागिने चामोर्शी येथील एका सराफाकडे सुमारे २ लाख ५५ हजार रुपयांना विकल्याची माहिती समोर आल्याचा आरोप आहे.
JCB भाड्याने देण्याच्या बहाण्याने परस्पर विकल्याचा आरोप
या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे डिसेंबर २०२३ मध्ये आरमोरी येथील एका परिचित व्यक्तीचा JCB भाड्याने देण्याच्या बहाण्याने परस्पर नेऊन तो कबाडात विकल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ऑनलाइन गेमिंगमधील आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी आणि पैशांची गरज भागविण्यासाठी हा प्रकार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
चामोर्शी पोलिसांचा तपास सुरू
या संपूर्ण प्रकरणामुळे नातेवाईकांमधील विश्वासाला तडा गेल्याचे चित्र असून, ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाचे गंभीर आर्थिक परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत.
या प्रकरणी चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून संबंधित आरोपांची पडताळणी आणि पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, संबंधित तरुणाने चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तसेच चामोर्शी परिसरातील इतर नातेवाईकांकडूनही पैसे घेतल्याची माहिती समोर येत असल्याचे सांगितले जात आहे. या बाबींचीही पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.
ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनापायी लाखो रुपयांचे नुकसान, त्यानंतर कर्जाचा वाढता बोजा आणि अखेर नातेवाईकांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप
या घटनेने तरुणाईला ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या व्यसनाबाबत गंभीर इशारा दिला आहे.

