
आत्मसमर्पित माजी माओवादी सदस्यांसाठी जनजागरण मेळावे; पुनर्वसन, रोजगार, आरोग्य व शासकीय योजनांची माहिती
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली : हिंसाचाराचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात परतलेल्या आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना सन्मानाने आणि स्वाभिमानाने नवजीवन जगता यावे, यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून दि. 15 सप्टेंबर रोजी पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे, तर दि. 17 सप्टेंबर रोजी पोलीस उप-मुख्यालय (प्राणहिता), अहेरी येथे भव्य जनजागरण मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले.

या मेळाव्यांमधून आत्मसमर्पित माजी माओवादी सदस्यांना शासनाच्या विविध पुनर्वसन योजना, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, कौशल्य विकास प्रशिक्षण तसेच आरोग्यविषयक सुविधांची सविस्तर माहिती देण्यात आली. आत्मसमर्पणानंतर केवळ सुरक्षितता नव्हे, तर आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक पुनर्वसनाला चालना देण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले.
मेळाव्यात लाभार्थ्यांना आधार कार्ड, ई-श्रम कार्ड आणि आयुष्मान भारत कार्ड उपलब्ध करून देण्यात आले. तसेच शासनाच्या पुनर्वसन धोरणांतर्गत पुनर्वसन निधीचे धनादेश वितरित करण्यात आले. आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून सहभागींची आरोग्य तपासणी करून आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शनही करण्यात आले.
‘प्रोजेक्ट संजीवनी’च्या माध्यमातून आत्मसमर्पित सदस्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने सहभागी करून घेण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांच्या भवितव्याला स्थैर्य देण्याचा प्रयत्न केला जात आहे. नवी ओळख, नवा आत्मविश्वास आणि सन्मानाचे नवजीवन या भावनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे आत्मसमर्पित सदस्यांना विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्यासाठी नवी दिशा मिळत आहे.
हिंसाचारातून विकासाकडे, संघर्षातून स्वावलंबनाकडे आणि दहशतीच्या सावटातून सन्मानाच्या जीवनाकडे वाटचाल घडविण्याचा संदेश ‘प्रोजेक्ट संजीवनी’च्या माध्यमातून अधोरेखित होत आहे.

