
अभिजित दिपके यांच्या शाळा पाहणीत धक्कादायक चित्र; कुठे एक शिक्षक, तर कुठे २७ विद्यार्थ्यांसाठी अवघे दोन शिक्षक
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली
एटापल्ली : अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात असल्याचा दावा केला जात असला, तरी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील शाळांची प्रत्यक्ष स्थिती मात्र या दाव्यांना छेद देणारी असल्याचे समोर आले आहे. ‘काॅक्रोज जनता पार्टी (सीजेपी)’चे संस्थापक अभिजित दिपके यांनी गडचिरोली दौऱ्यादरम्यान गुरुवारी एटापल्ली तालुक्यातील कोसा आलेंगा, कोहका आणि डुम्मे येथील जिल्हा परिषद शाळांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी ग्रामीण भागातील शालेय शिक्षणाची भीषण परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आली.

कोसा आलेंगा येथे शाळेची इमारत असूनही शिक्षकांचा अभाव असल्याने तीन विद्यार्थिनींना तब्बल तीन किलोमीटर जंगलातून पायी चालत कोहका येथील शाळेत जावे लागत असल्याचे समोर आले. परिसरात वाघांची दहशत असून सर्पदंश तसेच इतर हिंस्र प्राण्यांचा धोका असतानाही चिमुकल्या मुलींना दररोज हा जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याची बाब गंभीर आहे.
कोहका येथील शाळेत २७ विद्यार्थ्यांसाठी केवळ दोन शिक्षक कार्यरत असल्याने जागेअभावी एकाच खोलीत पहिली ते चौथीचे वर्ग एकत्र भरविले जात असल्याचेही पाहणीत दिसून आले. शाळेची स्वच्छता करण्यात आली असली, तरी प्रत्यक्ष शैक्षणिक व्यवस्था सुधारण्यासाठी शिक्षक नियुक्त करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
डुम्मे शाळेत ४७ विद्यार्थ्यांसाठी केवळ दोन वर्गखोल्या
एटापल्ली तालुक्यातील इम्मे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ४७ विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांच्या वाट्याला केवळ दोन वर्गखोल्या, दोन शिक्षक आणि एक मुख्याध्यापक असल्याची माहिती समोर आली. वर्गखोल्यांमध्ये पंखे नसताना कार्यालयात मात्र पंखा असल्याचेही पाहणीत निदर्शनास आले.
विशेष म्हणजे, २०२३ मध्ये शाळेची इमारत जीर्ण झाल्याने ती निर्लेखित करण्याचे पत्र देण्यात आले होते, मात्र त्यानंतरही त्यावर अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचे सांगण्यात आले. तसेच गेल्या दोन वर्षांपासून स्वच्छतागृहाची मागणी प्रलंबित असल्याचेही समोर आले.
‘दोन वर्षे का लागली?’; पिण्याच्या पाण्याच्या सुविधेवरून प्रशासनाला सवाल
अभिजित दिपके यांच्या भेटीच्या अवघ्या एक दिवस आधी प्रशासनाने शाळेत पिण्याच्या पाण्यासाठी नळाची व्यवस्था केल्याचे सांगण्यात आले. यावर दिपके यांनी, “एखादी सुविधा एका दिवसात उपलब्ध होऊ शकते, तर त्यासाठी दोन वर्षे का लागली?” असा सवाल उपस्थित केला. पोषण आहाराची व्यवस्था समाधानकारक असल्याचे सांगण्यात आले, मात्र कर्मचाऱ्यांना अत्यल्प मानधन मिळत असल्याची बाबही समोर आली.
“जंगलातून शाळेत येताना मुलांवर वन्यप्राण्यांचा हल्ला झाला तर जबाबदारी कोणाची?”
गडचिरोलीतील शिक्षणव्यवस्थेवर तीव्र संताप व्यक्त करत अभिजित दिपके यांनी प्रशासनासमोर गंभीर प्रश्न उपस्थित केले. “जंगलातून शाळेत येताना मुलांवर वन्यप्राण्यांचा हल्ला झाला तर त्याची जबाबदारी प्रशासन घेणार का?”, असा सवाल त्यांनी केला.
तसेच, “एखाद्या मंत्र्याचा किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याचा मुलगा अशा परिस्थितीत तीन किलोमीटर पायी चालत शाळेत जात असेल, तर प्रशासनानेही अशीच व्यवस्था ठेवली असती का?”, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी केली.
शिक्षणाचा हक्क की सुविधांपासून वंचित ठेवण्याची वेळ?
शाळेची इमारत गावात असूनही शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना दुसऱ्या गावात धोकादायक जंगलवाटेने जावे लागणे, अपुऱ्या वर्गखोल्या, शिक्षकांची कमतरता, स्वच्छतागृहाचा अभाव आणि जीर्ण इमारतीचा प्रश्न यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्कासोबतच त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित शाळा इमारती, पुरेसे शिक्षक, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आणि सुरक्षित रस्ते तातडीने उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

