
धानाला योग्य भाव, नुकसानभरपाई, वन्यप्राणी हल्ल्यातील मदत, समृद्धी महामार्ग आणि रोजगाराच्या प्रश्नांवर शासनाला जाब
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली/चंद्रपूर : गडचिरोली जिल्ह्यासह चिमूर व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चंद्रपुरात काँग्रेसच्या वतीने महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद घेण्यात आली. महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेत शेतकरी, ग्रामीण भाग आणि बेरोजगार युवकांच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली.

धान उत्पादक शेतकऱ्यांना शेतीमालाला योग्य भाव, धान खरेदीतील अडचणी, नुकसानभरपाई, सिंचन, शेतीमालाची वाहतूक, बाजारपेठ आणि शासकीय योजनांचा लाभ यांसह विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. शेतकऱ्यांच्या जमिनी आणि उपजीविकेशी संबंधित प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची मागणी करण्यात आली.
वन्यप्राणी हल्ल्यातील कुटुंबांना ५० लाखांची मदत द्या
ग्रामीण भागात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे होणाऱ्या जीवितहानीचा मुद्दाही पत्रकार परिषदेत ठळकपणे मांडण्यात आला. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना सध्या देण्यात येणारी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत वाढवून ५० लाख रुपये करावी, तसेच कुटुंबातील एका पात्र सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
गुटखा-तंबाखूच्या अवैध विक्रीवर कठोर कारवाईची मागणी
अवैध बनावटी तंबाखू, गुटखा आणि प्रतिबंधित पदार्थांची विक्री रोखण्यासाठी प्रभावी कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीवर कठोर निर्बंध आणि नियमित कारवाई आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
समृद्धी महामार्गाचा निर्णय शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच घ्या
गडचिरोली, ब्रह्मपुरी आणि भंडारा परिसरातून प्रस्तावित असलेल्या समृद्धी महामार्गाबाबतही शेतकऱ्यांची भूमिका स्पष्टपणे मांडण्यात आली. स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून, त्यांच्या जमिनी व उपजीविकेवर होणारा परिणाम तसेच स्थानिक परिस्थितीचा विचार करूनच महामार्गाचा मार्ग निश्चित करावा, अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कोणताही निर्णय घेऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले.
१५ वर्षांत मोठा उद्योग नाही; युवकांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर
MIDCमध्ये जागा उपलब्ध असतानाही गेल्या १५ वर्षांत एकही मोठा उद्योग उभारला गेला नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. परिणामी स्थानिक युवक आणि बेरोजगारांना रोजगारासाठी इतर भागांत स्थलांतर करावे लागत असल्याचे सांगण्यात आले. MIDC परिसरात नवीन उद्योग आणून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि त्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने पाठपुरावा करीत राहील, असे महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांनी यावेळी स्पष्ट केले. संबंधित विभागांनी केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रपूर शंतनू धोटे, तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी नागभीड प्रमोद चौधरी, विधानसभा अध्यक्ष युवक काँग्रेस चिमूर प्रशांत डवले, माजी जिल्हा महासचिव युवक काँग्रेस रोहन नन्नावरे, कार्याध्यक्ष चिमूर युवक काँग्रेस सजित कारेकार, विधानसभा महासचिव चिमूर कुंदन पडवेकर, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली वसंत राऊत, जिल्हा उपाध्यक्ष गडचिरोली अनिल कोठारे, ओबीसी जिल्हा कार्याध्यक्ष दिवाकर निसार, विपुल येलटीवार, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सावली प्रमोद दाजगाये, युवक विधानसभा उपाध्यक्ष चिमूर अमर नवघडे, युवराज घोटेकर, राजेंद्रनाथ मेश्राम, हरीश मुंडे, चेतन खोब्रागडे, हितेश ठाकरे, पवन नवघडे, समीर कुळमेथे, शुभम कुळमेथे, दीपक ठाकरे, सचिन वाटगुरे, भगवान डाकारे, कृष्णा कोहपरे, रामाजी हुलके, राजेश भोंडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते.

