
एटापल्ली (गडचिरोली ) : एटापल्ली तालुक्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एटापल्लीपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या डुम्मे येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देताना शाळेतील विद्यार्थिनींसाठी असलेल्या शौचालयाची दुरवस्था पाहून अभिजीत दिपके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांच्या जिल्ह्यातील शाळेत मुला-मुलींना पुरेशा शौचालयाच्या सुविधा उपलब्ध नसणे ही गंभीर बाब असल्याची टीका त्यांनी केली.
अभिजीत दिपके यांनी सकाळी सुमारे ११ वाजता एटापल्ली पासून अवघ्या 3 किमी अंतरावर असलेल्या डुम्मे येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. शाळेच्या आवारात प्रवेश केल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम मुला-मुलींसाठी असलेल्या बाथरूम व शौचालयांची पाहणी केली. यावेळी शौचालयाची झालेली अवस्था, दरवाजांची उपलब्धता तसेच विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर त्यांनी स्वयंपाकघर, विद्यार्थ्यांना दिले जाणारे भोजन तसेच शाळेतील इतर भौतिक सुविधांचीही पाहणी केली.
शाळेची पाहणी करताना दिपके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देताना शाळांमध्ये किमान आवश्यक सुविधा असणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, प्रत्यक्ष शाळेतील परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांनी शासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

“मुख्यमंत्री स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री असताना एटापल्लीजवळील शाळेत मुला-मुलींसाठी बाथरूम आणि शौचालयांची एवढी वाईट अवस्था पाहायला मिळणे धक्कादायक आहे. शौचालयाला दरवाजाच नसल्याने विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा आणि गोपनीयतेचा प्रश्न निर्माण होतो. येथे आदिवासी मुले शिक्षण घेतात म्हणून त्यांच्यासाठी अशा सुविधा ठेवण्यात आल्या आहेत का?” असा सवाल दिपके यांनी उपस्थित केला.
शाळेतील स्वच्छता, विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजा आणि शैक्षणिक वातावरण याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. केवळ शाळांमध्ये विद्यार्थी उपस्थित राहतात की नाही, एवढ्यावर लक्ष न देता त्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानजनक वातावरण मिळते की नाही, याचीही नियमित तपासणी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डुम्मे शाळेच्या पाहणीदरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. शाळेतील सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर दिपके यांनी नाराजी व्यक्त करत संबंधित प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली.
एटापल्लीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच स्वच्छ पाणी, स्वच्छतागृहे, सुरक्षित परिसर आणि आवश्यक भौतिक सुविधा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे डुम्मे जिल्हा परिषद शाळेतील शौचालयाच्या दुरवस्थेवर प्रशासनाकडून आता कोणती कार्यवाही केली जाते, याकडे पालक व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

