
नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश; वीजखांब उभारून पुरवठा सुरळीत करण्याच्या महावितरणला सूचना
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
आरमोरी, दि. १७ सप्टेंबर : आरमोरी तालुक्यातील सिर्सी येथे रानटी हत्तीने शेतीपिकांचे मोठे नुकसान केल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या नुकसानीची तात्काळ दखल घेत आमदार रामदास मसराम यांनी वनविभाग व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली.

हत्तीच्या धुडगुसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून आमदार मसराम यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून शासनाकडून मदत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना दिले. शेतकऱ्यांचे नुकसान कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्षित होता कामा नये, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
दरम्यान, रानटी हत्तीच्या वावरामुळे वीजेचे दोन खांब कोसळल्याची माहिती मिळताच आमदार मसराम यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधला. पडलेले खांब त्वरित उभारून परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीवर तातडीने उपाययोजना करण्यासोबतच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळवून देण्यासाठी ठोस पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही आमदार मसराम यांनी दिली.
यावेळी काँग्रेस कमिटी आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ते धनपाल मिसार, भूपेश कोलते, वनपरिक्षेत्र अधिकारी पाचभाई, क्षेत्र सहाय्यक समर्थ, वनरक्षक वाळके, दोडके, आंबेडारे, कृषी सहायक आत्राम, समूह कृषी सहायक बोरकर, वनमजूर उरकडे, तसेच श्रीकांत भजभुजे, सुरेश फुकटे, रमेश मुरमुरवार, वासुदेव पेंदाम, कुमोद कुलशिंगे, विपूल वाघाडे यांच्यासह संबंधित अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या नुकसानीची तात्काळ दखल घेत प्रत्यक्ष बांधावर पोहोचलेले आमदार मसराम; पंचनामे, मदत आणि वीजपुरवठ्यासाठी प्रशासनाला धारेवर धरत तातडीच्या कार्यवाहीच्या सूचना!

