
३.६ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद; १० किमी खोलीवर केंद्रबिंदू, प्राथमिक माहितीनुसार जीवित-वित्तहानी नाही
जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली
गडचिरोली, दि. ३ सप्टेंबर : गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी पहाटेच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ खळबळ उडाली. पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांनी ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली असून, भूकंपाची खोली सुमारे १० किलोमीटर असल्याची प्राथमिक माहिती आहे.

या भूकंपाचा केंद्रबिंदू सिरोंचा तालुक्यातील राखीव वनक्षेत्र परिसरात असल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे. भूकंपाचे धक्के अहेरी तालुक्यातील अहेरी तसेच नागेपल्ली परिसरातही जाणवल्याची माहिती तहसील प्रशासनाकडून मिळाली आहे.
भूकंपाचा धक्का सौम्य स्वरूपाचा असला तरी पहाटेच्या वेळी अचानक जाणवलेल्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, प्राथमिक माहितीनुसार या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून, विविध भागांतील नुकसानीची माहिती घेतली जात आहे. सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारच्या गंभीर नुकसानीची नोंद झालेली नाही.
जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन
“भूकंपाच्या सौम्य धक्क्यांमुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. शांतता राखून आवश्यक ती दक्षता बाळगावी. भूकंपासंदर्भातील अफवा किंवा अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये. प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे,” असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

