
एटापल्ली : जपतलाई येथील आश्रमशाळेत सर्पदंशाच्या दुर्दैवी घटनेत दोन निष्पाप विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे संबंधित कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहण्याच्या सामाजिक बांधिलकीतून सावित्रीच्या लेकी विकास संस्था, एटापल्ली आणि दक्षता समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
सर्पदंशाच्या घटनेत दीपिका एतवा लकडा तसेच सुमिता सरोजित मंडल यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांच्या दुःखात सहभागी होत धीर दिला.
भेटीदरम्यान पदाधिकाऱ्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत घटनेची माहिती जाणून घेतली. आपल्या लहानग्या मुलीच्या आकस्मिक निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे अशक्य असले, तरी या कठीण प्रसंगी कुटुंबीयांना मानसिक आधार मिळावा, यासाठी सामाजिक संस्था आणि नागरिकांनी त्यांच्या पाठीशी राहणे आवश्यक असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था सुरक्षित असणे, परिसरात सर्प व इतर विषारी जीवांचा धोका टाळण्यासाठी नियमित उपाययोजना करणे तसेच आपत्कालीन वैद्यकीय सुविधा तत्काळ उपलब्ध होणे गरजेचे असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या सांत्वनपर भेटीत पौर्णिमाताई श्रीरामवार, सुनीताताई चांदेकर यांच्यासह गुलशन शेख, कलिमा शेख, शालिनी नैताम, वंदना कुंकूलवार , रेहाना शेख, बैतीताई नरोटे , वंदना उपगंलावर , बेबी हेडो , जया पुडो, छाया जेट्टी , वैशाली सोनटक्के, मनीषा नाडमवार आदी उपस्थित होते.
दोन कुटुंबांच्या दुःखात सहभागी होत दिलेला हा आधार संवेदनशील समाजव्यवस्थेचे उदाहरण ठरला आहे.

