
शांततामय व सुरक्षित गणेशोत्सवासाठी मंडळांना पोलिसांचे आवाहन; १८ वर्षांखालील मुलांचा गणेश मंडळात समावेश न करण्याच्या सूचना
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली/चामोर्शी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस स्टेशन चामोर्शीच्या वतीने गणेशोत्सव पूर्वतयारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात १४ सप्टेंबर २०२६ पासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असून, उत्सव काळात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाने आतापासूनच नियोजनाला सुरुवात केली आहे.

पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता संस्कृती सांस्कृतिक भवन (सभागृह), आरमोरी रोड, गडचिरोली येथे गणेशोत्सवाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस चामोर्शी पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश मंडळांचे अध्यक्ष, सचिव व आयोजक, पोलीस पाटील, गावातील प्रतिष्ठित नागरिक, शांतता समिती व मोहल्ला समितीचे पदाधिकारी तसेच पोलीस स्टेशन स्तरावरील मान्यवरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
१८ वर्षांखालील मुलांचा मंडळात समावेश नाही!
गणेश मंडळांच्या माध्यमातून उत्सव साजरा करताना नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषतः गणेश मंडळामध्ये १८ वर्षांखालील मुलांचा समावेश करण्यात येऊ नये, याबाबत सर्व गणेश मंडळांनी नोंद घ्यावी, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
गणेशोत्सव हा श्रद्धा, उत्साह आणि सामाजिक एकोप्याचा सण असून तो शांततेत व कायद्याचे पालन करून साजरा करण्यासाठी सर्वांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी केले आहे.
“कायदा व सुव्यवस्था राखूया, शांततामय गणेशोत्सव साजरा करूया!” असा संदेश देत चामोर्शी पोलिसांनी नागरिकांना आणि गणेश मंडळांना उत्सवासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

