
गणपूर-जयरामपूर मार्गावरील एसटी सेवा सुरळीत करण्याची मागणी; ६४ विद्यार्थ्यांचा एल्गार, आमदारांना निवेदन
जिल्हा प्रतिनिधी| नितेश गट्टीवार
गडचिरोली/चामोर्शी : ग्रामीण भागातून चामोर्शी येथे शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची एसटी बससेवेअभावी होणारी गैरसोय अखेर लोकप्रतिनिधींच्या दारात पोहोचली आहे. गणपूर-जयरामपूर मार्गावरील बससेवा नियमित व वेळेत सुरू करण्याच्या मागणीसाठी तब्बल ६४ विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला असून, आज दि. २ सप्टेंबर रोजी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या चामोर्शी कार्यालयात धाव घेत निवेदन सादर केले.

गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण विद्यार्थ्यांना चामोर्शी येथे शाळा-महाविद्यालयात येण्यासाठी तसेच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गावाकडे परतण्यासाठी एसटी बससेवेच्या अनियमिततेचा मोठा फटका बसत आहे. बस वेळेवर न मिळाल्याने विद्यार्थ्यांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असून, त्यांच्या शैक्षणिक वेळापत्रकावरही परिणाम होत आहे.
याच प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. १ सप्टेंबर रोजी चामोर्शी बसस्थानकावर विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. आंदोलनानंतरही प्रश्न कायम असल्याने विद्यार्थ्यांनी आता थेट आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्याकडे धाव घेत आपल्या मागणीचे निवेदन दिले.
मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे यांच्या मार्फत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी कार्यालय प्रमुख विनोद किरमे उपस्थित होते.आला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वेळापत्रकाचा विचार करून गणपूर-जयरामपूर मार्गावरील एसटी बसच्या फेऱ्या व वेळेत आवश्यक बदल करावेत आणि नियमित, सुरळीत व विद्यार्थ्यांना सोयीची बससेवा तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी निवेदनातून करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित असलेला हा प्रश्न तातडीने मार्गी लावून ग्रामीण विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
निवेदन देणारे विद्यार्थी
स्नेहल एकनाथ वेलमाटे, सायली संजय वाडपल्लीवार, सायली नाथ हंडेकर, प्रणय हेमकळ कुस्तुरे, रोहित बंडू पुडेलवार, संकेत सुनील हंडेकर, चुलबीराम एखामकर साडे यांच्यासह एकूण ६४ विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
“बससेवा सुरळीत करा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवा!” अशी मागणी आता जोर धरू लागली असून, या प्रश्नावर आमदार व प्रशासन काय निर्णय घेतात, याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे.

