
५६ रुग्णांवर होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया; रक्तदान, आरोग्य तपासणीसह वृक्षारोपण व गरजूंना मदतीतून समाजसेवेचा आदर्श
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली/चामोर्शी : सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती अतुल गण्यारपवार यांच्या पुढाकारातून चामोर्शी शहर व तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडले. या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

चामोर्शी येथील गण्यारपवार फाउंडेशन, नागपूर येथील महात्मे नेत्र रुग्णालय आणि शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल ६७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. याचवेळी ४३० नागरिकांची मोतीबिंदू व नेत्र तपासणी करण्यात आली.
तपासणीत मोतीबिंदू आढळलेल्या ५६ रुग्णांना पुढील मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नागपूर येथील महात्मे नेत्र रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे.
रक्तदान शिबिराला जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सहकार्य
रक्तदान शिबिरासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्त संक्रमण अधिकारी डॉ. नागेश शाहू यांच्यासह रक्तकेंद्र तंत्रज्ञ राहुल सिडाम, प्रयोगशाळा सहाय्यक नयनतारा मोहुर्ले, अधिपरिचारिका शिल्पा मेश्राम, सहाय्यक राजकुमार भगत, बंडू कुंभारे, तन्वी मंगरे, भाविका लोंढे, समीक्षा धोडरे आदींनी सहकार्य केले. नेत्र तपासणीसाठी डॉ. अरविंद डोंगरवार यांच्यासह चमूने सेवा बजावली.
रक्तदानापासून वृक्षारोपणापर्यंत सेवाकार्यांची मालिका
केवळ आरोग्य शिबिरापुरतेच उपक्रम मर्यादित न ठेवता तालुक्यात विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आले. आमगाव महाल येथे उपसरपंच विनोद शेंगर यांच्या पुढाकाराने निराधार नागरिकांना जीवनोपयोगी वस्तूंचे वितरण करण्यात आले. घोट येथे वृक्षारोपण व रुग्णालयात फळवाटप करण्यात आले.
चामोर्शीतील मतिमंद निवासी शाळेत साहित्य वाटप, तसेच मोहोली व मुरखळा परिसरात वृक्षारोपण आणि फळझाडांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांमुळे रक्तदानातून जीवनदान, नेत्र तपासणीतून दृष्टीदान आणि वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धन असा समाजसेवेचा त्रिवेणी संगम पाहायला मिळाला.
कार्यक्रमाला अमोल गण्यारपवार, अजिंक्य गण्यारपवार, जय गण्यारपवार, मधुकर चिंतलवार, रुपाली दहेलकर, भाग्यश्री चिंतलवार, मुरलीधर बुरे यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक, लोकप्रतिनिधी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
एकूणच, वाढदिवस किंवा वैयक्तिक कार्यक्रमांना केवळ औपचारिक स्वरूप न देता समाजोपयोगी उपक्रमांद्वारे जनसेवेचा संदेश देण्याचा हा प्रयत्न चामोर्शीत चर्चेचा विषय ठरला आहे.

