
एटापल्ली : तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या जारावंडी ग्रामपंचायतीचा कारभार सध्या अक्षरशः वाऱ्यावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतीला नियमित ग्रामसेवक उपलब्ध नसल्याने सलग तीन वेळा ग्रामसभा तहकूब करण्याची वेळ आली असून, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ग्रामसभा ही गावाच्या विकासाचा आणि लोकशाही निर्णयप्रक्रियेचा महत्त्वाचा मंच असताना ग्रामसेवकाच्या अनुपस्थितीमुळे तीच प्रक्रिया वारंवार ठप्प होत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
जारावंडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक मनोज गेडाम हे सेवारी ग्रामपंचायतीचेही प्रभारी होते. सेवारी ग्रामपंचायतीतील कथित अनियमितता प्रकरणानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतरपासून जारावंडी ग्रामपंचायतीला नियमित ग्रामसेवक उपलब्ध झालेला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दरम्यानच्या काळात कोडापे यांच्याकडे ग्रामसेवकाची जबाबदारी देण्यात आली होती; मात्र तेही जारावंडी ग्रामपंचायतीला येणार नसल्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना लेखी कळविल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मोठ्या लोकसंख्येच्या या ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कारभार कोणाच्या भरवशावर सुरू आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, आज दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी यापूर्वी तहकूब झालेली ग्रामसभा पुन्हा आयोजित करण्यात आली होती. गावातील विविध प्रश्न मांडण्यासाठी नागरिक आपले कामधंदे बाजूला ठेवून ग्रामपंचायतीत मोठ्या अपेक्षेने दाखल झाले; मात्र यावेळीही ग्रामसेवक उपस्थित नसल्याने ग्रामसभा पुन्हा रखडल्याचे सांगण्यात येत आहे. वारंवार ग्रामसभा बोलावून नागरिकांना उपस्थित राहण्यास भाग पाडायचे आणि त्यानंतर जबाबदार अधिकारीच अनुपस्थित राहायचे, तर ग्रामस्थांनी आपले प्रश्न मांडायचे कुठे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

जारावंडी ही एटापल्ली तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असून आर्थिक व प्रशासकीयदृष्ट्याही तिचे महत्त्व मोठे आहे. अशा ग्रामपंचायतीला नियमित ग्रामसेवक उपलब्ध होत नसेल आणि सलग तीन ग्रामसभा तहकूब होण्याची वेळ येत असेल, तर तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींची परिस्थिती काय असेल, असा सवाल आता उपस्थित होत आहे. प्रशासनाने या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन जारावंडीला कायमस्वरूपी नियमित ग्रामसेवक उपलब्ध करून द्यावा आणि ग्रामसभा व ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
आठ दिवसांची मुदत; अन्यथा जारावंडी ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा ग्रामसभेचा ठराव!
जारावंडी ग्रामपंचायतीला तातडीने नियमित ग्रामसेवक उपलब्ध करून न दिल्यास आठ दिवसांनंतर ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून बंद करण्याचा ठराव आजच्या ग्रामसभेत सर्वानुमते घेण्यात आला. सलग तीन वेळा ग्रामसेवकाच्या अनुपस्थितीमुळे ग्रामसभा तहकूब झाल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला असून, आता प्रशासन या ठरावाची कितपत दखल घेते आणि आठ दिवसांत ग्रामसेवक उपलब्ध करून देते का, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास ग्रामस्थांच्या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, हे येणाऱ्या दिवसांत स्पष्ट होणार आहे.

