
‘प्रोजेक्ट संजीवनी’तून पुनर्वसनाला गती; रोजगार, कौशल्य विकासासह विविध सुविधांचे पाठबळ
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली : हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात परतलेल्या आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या पुनर्वसनाला गडचिरोली पोलीस दलाने मोठी चालना दिली आहे. गडचिरोली पोलिसांच्या पुढाकारातून ५० आत्मसमर्पित माओवादी सदस्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. यानंतर या सदस्यांना सुरक्षितपणे त्यांच्या मूळ जिल्ह्यांकडे रवाना करण्यात आले.

शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणासोबतच गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’ च्या माध्यमातून आत्मसमर्पित सदस्यांना नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी विविध प्रकारचे सहकार्य केले जात आहे.
आर्थिक मदत, आवश्यक शासकीय कागदपत्रांची पूर्तता, कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण, आरोग्य सुविधा, समुपदेशन तसेच सामाजिक पुनर्वसनाच्या माध्यमातून त्यांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
८१९ माओवाद्यांचे आत्मसमर्पण;
पुनर्वसनाला मिळतेय नवी दिशा गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत ८१९ माओवादी सदस्यांनी आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पणानंतर त्यांना सन्मानाने समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. ‘प्रोजेक्ट संजीवनी’च्या माध्यमातून आतापर्यंत ४६ आत्मसमर्पित माओवादी जोडप्यांचे सामूहिक विवाह घडवून आणण्यात आले असून, ८८ आत्मसमर्पित सदस्यांना कौशल्य विकास प्रशिक्षणासह रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
‘नवी ओळख, नवे आयुष्य’चा विश्वास
निरोप समारंभात पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी आत्मसमर्पित सदस्यांना आत्मनिर्भर बनून आपल्या कुटुंबासोबत सुरक्षित, सुखी आणि सन्मानाचे जीवन जगण्याचे आवाहन केले. समाजाच्या मुख्य प्रवाहात सकारात्मक योगदान देत उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
गडचिरोली पोलिसांच्या या उपक्रमामुळे बंदुकीच्या हिंसेपासून दूर जात अनेकांना रोजगार, कुटुंब, सन्मान आणि सुरक्षित भविष्याची नवी वाट मिळत आहे.

