
विज्ञान प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन; विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांची घेतली पाहणी, कौतुकासह दिले प्रेरणादायी मार्गदर्शन
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
चामोर्शी, दि. २ सप्टेंबर : चामोर्शी येथील एकलव्य आदिवासी निवासी शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध वैज्ञानिक प्रकल्पांची पाहणी करून त्यांच्या कल्पकतेचे व उपक्रमशीलतेचे मनापासून कौतुक केले.

विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला, वैज्ञानिक दृष्टिकोनाला आणि नव्या संकल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित आकर्षक व नाविन्यपूर्ण वैज्ञानिक प्रकल्प सादर केले. पोलीस निरीक्षक ढाकणे यांनी प्रत्येक प्रकल्पाची बारकाईने पाहणी करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रकल्पामागील संकल्पना, कार्यपद्धती व उपयोग याबाबत माहिती जाणून घेतली.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेचे विशेष कौतुक करत शिक्षण हे केवळ पुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता प्रयोग, निरीक्षण आणि प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून ज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उपक्रमांसोबतच विविध सामाजिक व सर्जनशील उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, आपले कौशल्य विकसित करावे आणि भविष्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करावी, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला. त्यांच्या प्रोत्साहनपर शब्दांनी विद्यार्थ्यांना आपल्या वैज्ञानिक व सर्जनशील उपक्रमांना आणखी व्यापक स्वरूप देण्याची प्रेरणा मिळाली. विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये ‘करून शिकण्याची’ वृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास निर्माण होत असल्याचे यावेळी प्रकर्षाने दिसून आले.
ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य व्यासपीठ आणि प्रोत्साहन मिळाल्यास तेही विज्ञान, तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रांत मोठी झेप घेऊ शकतात, याचीच झलक या विज्ञान प्रदर्शनातून पाहायला मिळाली.

