
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, मुडझा येथे १५ ऑगस्ट रोजी ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राकेश लोनारकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीतानंतर विद्यार्थ्यांनी बँडच्या तालावर देशभक्तिपर घोषवाक्यांसह गावातून प्रभातफेरी काढली.
यानंतर विद्यार्थ्यांनी कवायत संचलन, देशभक्तिपर गीते व नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. दि. ९ ते १४ ऑगस्टदरम्यान आयोजित विविध उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

यावेळी राकेश लोनारकर यांनी विद्यार्थ्यांनी मन लावून शिक्षण घेऊन देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन केले.
मुख्याध्यापिका सुजाता चन्नावार यांनी देशप्रेम, शिस्त, स्वच्छता व सामाजिक जबाबदारीचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमास शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या जयघोषात कार्यक्रमाची सांगता झाली.

