
गडचिरोली जिल्हा युवा संस्था पुरस्काराने युवा संकल्प बहुउद्देशीय संस्थेचा सन्मान
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली | दि. १५ ऑगस्ट २०२६ : ग्रामीण भागातील युवकांना सामाजिक कार्याची प्रेरणा देत ग्रामविकास, पर्यावरण संवर्धन आणि समाजहिताच्या विविध उपक्रमांत सातत्याने योगदान देणाऱ्या युवा संकल्प बहुउद्देशीय संस्थेच्या कार्याला जिल्हास्तरीय मानाचा तुरा लाभला आहे. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा ‘गडचिरोली जिल्हा युवा संस्था पुरस्कार (२०२५-२६)’ युवा संकल्प बहुउद्देशीय संस्थेला प्रदान करण्यात आला.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात संस्थेचे राहुल वैरागडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. ग्रामीण भागातील युवकांना संघटित करून त्यांच्यामध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करणे, ग्रामविकासासाठी पुढाकार घेणे आणि विविध सामाजिक उपक्रम राबविणे या उल्लेखनीय कार्याची शासनाने दखल घेत संस्थेला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला.
युवा संकल्प संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन, युवकांना मार्गदर्शन, सामाजिक जनजागृती, ग्रामविकासाचे उपक्रम तसेच ग्रामस्थांमध्ये एकजूट निर्माण करण्यासाठी विविध विधायक उपक्रम सातत्याने राबविण्यात आले. ग्रामीण भागातील प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत त्यावर सामूहिक सहभागातून उपाययोजना करण्यासाठी संस्थेने केलेल्या प्रयत्नांमुळे अनेक युवक सामाजिक कार्याकडे वळले आहेत.
विशेषतः ‘युवक शक्ती हीच परिवर्तनाची खरी ताकद’ या भावनेतून संस्थेने युवकांच्या सहभागाला प्राधान्य दिले. सामाजिक उपक्रमांमध्ये तरुणांचा सहभाग वाढवून गावाच्या विकासात त्यांचे योगदान सुनिश्चित करण्यासाठी राहुल वैरागडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कार्याला या पुरस्कारामुळे जिल्हास्तरावर अधिकृत मान्यता मिळाली आहे.
या गौरव सोहळ्यास गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी अविशांत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश, नगराध्यक्षा प्रणोती निंभोरकर, सहायक जिल्हाधिकारी अरुण एम., डॉ. अजय डोके, अपर जिल्हाधिकारी नितीन गावडे, जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती.
सामाजिक कार्याला मिळालेली प्रेरणादायी पावती
युवा संकल्प बहुउद्देशीय संस्थेला मिळालेला हा पुरस्कार केवळ एका संस्थेचा गौरव नसून ग्रामीण भागातील युवकांच्या सामाजिक योगदानाची आणि सकारात्मक परिवर्तनाच्या चळवळीची पावती मानली जात आहे. या सन्मानामुळे संस्थेच्या आगामी सामाजिक कार्याला नवी ऊर्जा मिळाली असून, ग्रामीण विकास आणि युवक कल्याणासाठी अधिक व्यापक उपक्रम राबविण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

