
चामोर्शी,दि.१३ ॶॉगस्ट: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, चामोर्शी येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. हातात तिरंगा ध्वज, देशभक्तीपर घोषणा आणि भारतमातेच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रॅलीला उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले.
विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘जय हिंद’ अशा घोषणांनी नागरिकांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत केली. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी तिरंगा ध्वजाचा सन्मान राखत नागरिकांना प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन केले.

विद्यालयाचे प्राचार्य शाम रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी राजु धोडरे , प्रा. प्रेमानंद वालदे , गुरुदेव सातपुते , प्रविण नैताम ‘ निलेश क्षिरसागर , लोकनाथ दुधबळे , प्रा. प्रविण गव्हारे , प्रदिप भांडेकर , जयश्री कोठारे , दिपाली धोंगडे तथा शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, राष्ट्रध्वजाचे महत्त्व आणि देशाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव करून देण्यात आली. ‘हर घर तिरंगा’ हा केवळ अभियान नसून प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत प्रज्वलित करणारा उपक्रम आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला.
रॅलीत विद्यार्थ्यांचा उत्साह विशेष आकर्षण ठरला. तिरंग्याच्या रंगांनी सजलेले विद्यार्थी आणि देशभक्तीपर घोषणांमुळे चामोर्शी शहरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव, देशप्रेम आणि राष्ट्रध्वजाबद्दल आदराची भावना अधिक दृढ झाली.
यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे पालक, नागरिक आणि उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
स्वातंत्र्यदिनाचा उत्सव केवळ औपचारिक न राहता तो प्रत्येकाच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना निर्माण करणारा ठरावा, या उद्देशाने विद्यालयाने राबविलेली ही तिरंगा रॅली विशेष ठरली.

