
“महिलांचा सन्मान म्हणजे समाजाचा सन्मान” — समानतेतून सक्षम समाजनिर्मितीचा संदेश
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली/चामोर्शी, दि. १४ ऑगस्ट : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती, चामोर्शी येथे यंदा सामाजिक बांधिलकी जपणारा आणि महिलांच्या सन्मानाला अधोरेखित करणारा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. राष्ट्रध्वज फडकविण्याचा मान समाजातील एकल महिलांना देत पंचायत समितीने “महिलांचा सन्मान म्हणजे समाजाचा सन्मान” असा प्रेरणादायी संदेश दिला.

भेंडाळा येथील अर्चना अनिल कारंडे आणि इल्लूर येथील भाग्यश्री अरुण मडावी या एकल महिलांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दोन्ही महिलांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी त्यांच्या संघर्षाला आणि कर्तृत्वाला समाजाच्या मुख्य प्रवाहातून मानाची पावती देण्यात आली.
समाजात अनेक महिला प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत आपल्या कुटुंबाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडत आहेत.
परिस्थिती कितीही कठीण असली तरी खचून न जाता स्वावलंबन, आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर त्या आपले जीवन उभे करीत आहेत. अशा महिलांकडे केवळ सहानुभूतीच्या नजरेने न पाहता त्यांना सन्मान, समान संधी आणि प्रतिष्ठेचे स्थान मिळणे गरजेचे आहे, हा या उपक्रमाचा मुख्य सामाजिक संदेश आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने एकल महिलांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करून पंचायत समिती, चामोर्शीने महिलांच्या सक्षमीकरणाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला.
महिलांना निर्णय प्रक्रियेत आणि सार्वजनिक जीवनात समान स्थान मिळाले पाहिजे, तसेच त्यांच्या संघर्षाची समाजाने दखल घेतली पाहिजे, हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे अधोरेखित झाला.
या उपक्रमामुळे एकल महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यासोबतच समाजातील इतर महिलांनाही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सक्षमपणे पुढे येण्याची प्रेरणा मिळणार आहे. राष्ट्रध्वजारोहणाचा हा मान केवळ दोन महिलांचा सन्मान नसून, संघर्षातून उभ्या राहणाऱ्या प्रत्येक महिलेच्या जिद्दीला दिलेली सलामी ठरली.
“समानतेतून सक्षम समाजनिर्मिती” या विचाराला कृतीची जोड देणाऱ्या पंचायत समिती चामोर्शीच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
यावेळी प्रकाश पोळ, गट विकास अधिकारी, पंचायत समिती चामोर्शी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते.

