
उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दावा; ३६,२११ कंपन्यांच्या नोंदणी रद्दीकरणावर स्पष्टीकरण
गडचिरोली : महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जात असल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जोरदार पलटवार केला. महाराष्ट्रातून एकही उद्योग दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झालेला नसून, ३६ हजार २११ कंपन्यांची नोंदणी रद्द झाल्याचा आकडा उद्योग राज्याबाहेर गेल्याशी जोडणे चुकीचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. चुकीचे आकडे मांडून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
महाराष्ट्रात मागील साडेतीन वर्षांपासून थेट परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत राज्य देशात आघाडीवर असल्याचे उद्योगमंत्र्यांनी सांगितले. दावोस येथील एमओयूंपैकी सुमारे ७५ ते ८० टक्के करारांच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. नुकत्याच झालेल्या जीएसआय परिषदेद्वारे राज्यात सुमारे ५० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची अपेक्षा असून, त्यातून जवळपास पाच लाख तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले.

गडचिरोलीत स्टील हब उभारण्याचा निर्धार
गडचिरोलीच्या औद्योगिक विकासाबाबत बोलताना उदय सामंत यांनी जिल्ह्याला देशातील प्रमुख स्टील हब म्हणून विकसित करण्याचा मानस व्यक्त केला. मात्र, औद्योगिक विकास करताना स्थानिक शेतकरी आणि नागरिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
उद्योगांसाठी जमीन अधिग्रहण करताना शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून पारदर्शक प्रक्रिया आणि गरजेनुसारच जमीन अधिग्रहण केले जाईल. भविष्यातील विस्ताराच्या नावाखाली अतिरिक्त जमीन अधिग्रहित केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘उद्योग दरबार’ आणि ‘गाव तिथे उद्यमी’ अभियान
उद्योग क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी गडचिरोलीत ‘उद्योग दरबार’ आयोजित करण्यात येणार असून, जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींमध्ये ‘गाव तिथे उद्यमी’ अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली.
जिल्ह्यातील उद्योग, औद्योगिक प्रकल्प आणि एमआयडीसीच्या कामांचा आढावा घेताना त्यांनी प्रशासनाला गावागावात जाऊन नागरिक व शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्याच्या सूचना दिल्या. उद्योगांच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षणावरही भर दिला जाणार आहे.
गडचिरोलीचा औद्योगिक विकास हा शेतकरी, स्थानिक नागरिक आणि युवकांच्या हिताचा समतोल राखूनच केला जाईल, असा विश्वास उद्योगमंत्र्यांनी व्यक्त केला.

