
मुधोली–जैरामपूर परिसरातील १४ गावांतील शेतकरी आक्रमक; “पोटाची खळगी भरणारी जमीन हिरावून घेऊ नका”
जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली
चामोर्शी/आष्टी, दि. ७ ऑगस्ट : जमीन अधिग्रहणाच्या मुद्द्यावरून मुधोली–जैरामपूर परिसरातील शेतकऱ्यांचा संताप पुन्हा एकदा उफाळून आला आहे. विविध मागण्यांसाठी आज शुक्रवारी शेतकऱ्यांनी पोलिस ठाण्यावर ठिय्या आंदोलन केल्यानंतर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात चक्काजाम आंदोलन छेडत प्रशासनाचे लक्ष वेधले. आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

१४ गावांतील संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी पोलिस ठाण्यावर हल्लाबोल आंदोलन केले. तब्बल तीन तास ठिय्या देऊनही प्रशासनाकडून ठोस तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांनी सायंकाळी चार वाजल्यापासून चक्काजाम आंदोलन सुरू केले.
ड्रोन सर्व्हेवरून वादाला तोंड
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ९ जुलै २०२६ रोजी ड्रोनद्वारे मुधोली परिसरात शेतमोजणी सुरू असताना तीन कर्मचाऱ्यांना नागरिकांनी पकडले होते. त्यांना मारहाण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना शाळेच्या इमारतीत सुरक्षित ठेवले होते. या घटनेनंतर आंदोलन करणाऱ्या काही व्यक्तींविरुद्ध ११ जुलै रोजी गुन्हे दाखल करण्यात आले.
या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केली आहे.
“आमच्या पोटाची खळगी असलेली जमीन हिरावून घेऊ नका!”
शेतकऱ्यांचा मुख्य आक्षेप प्रस्तावित जमीन अधिग्रहणाला आहे. योग्य मोबदला न देता किंवा शेतकऱ्यांची संमती न घेता जमीन अधिग्रहित करू नये, अशी त्यांची ठाम भूमिका आहे.
“ही जमीन आमच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. जमीन गेल्यास शेतकरी कुटुंबांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे आमच्या पोटाची खळगी असलेली जमीन हिरावून घेऊ नका,” अशी संतप्त भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.
सात शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.पोलिस ठाण्यात तीन तास ठिय्या देऊनही समाधानकारक तोडगा न निघाल्याने अखेर शेतकऱ्यांनी चक्काजामचा मार्ग स्वीकारला.
जमीन अधिग्रहणाचा प्रश्न, शेतकऱ्यांवरील गुन्हे आणि ड्रोन सर्व्हेचा वाद यामुळे मुधोली–जैरामपूर परिसरातील वातावरण चांगलेच तापले असून, प्रशासन आता या आंदोलनावर कोणता तोडगा काढते, याकडे १४ गावांतील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

