
प्रलय सहारे
भेंडाळा | प्रतिनिधी
कान्होली ते मुरखडा या प्रमुख मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खराब झालेल्या रस्त्यामुळे दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

या मार्गावर आजपर्यंत अनेक लहान-मोठे अपघात घडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
विशेषतः पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि अपघाताचा धोका अधिक वाढतो. शालेय विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण तसेच रोज ये-जा करणाऱ्या नागरिकांना या मार्गाचा मोठा फटका बसत आहे.
स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून खड्डेमुक्त करावा, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

