
वरोरा : गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार व मुसळधार पावसाने वरोरा शहराला अक्षरशः झोडपून काढले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील अनेक प्रमुख रस्ते, चौक आणि भुयारी मार्ग पाण्याखाली गेले आहेत. अनेक सखल भागांतील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दैनंदिन जीवनावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे.
हवामान विभागाने चंद्रपूर जिल्ह्यासाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन शहरातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
शहरातील टिळक वॉर्ड, कर्मवीर वॉर्ड, माढळी चौक तसेच इतर सखल परिसरांत नाले तुडुंब भरल्याने पावसाचे पाणी रस्त्यांवर साचले. अनेक ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला, तर काही मार्गांवर वाहतूक तात्पुरती विस्कळीत झाली. पाण्याच्या प्रवाहामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले.

दरम्यान, नगर परिषदेच्या अपुऱ्या नियोजनामुळे आणि नाल्यांच्या नियमित साफसफाईचा अभाव असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाचे पाणी घरांमध्ये शिरल्याने अन्नधान्य, फर्निचर, विद्युत उपकरणे तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. अनेक कुटुंबांना रात्रभर जागून पाणी बाहेर काढावे लागल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव, साथीच्या आजारांचा धोका आणि सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पाणी उपसा, नाल्यांचा तातडीने निचरा आणि बाधित भागात आवश्यक मदत पोहोचविण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नाले, ओढे, पूरग्रस्त व सखल भागांपासून सुरक्षित अंतर राखावे, तसेच प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे.
सलग सुरू असलेल्या पावसामुळे वरोरा शहरातील परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष असून, पुढील काही तासांतील पावसाच्या तीव्रतेवर जनजीवन पूर्वपदावर येणार की अडचणी आणखी वाढणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

