
गडचिरोली/चामोर्शी | प्रतिनिधी
जयरामपूर,मुधोली परिसरातील प्रस्तावित जमीन अधिग्रहणाच्या विरोधात शेतकऱ्यांचा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असून, दुसऱ्या दिवशीही भरपावसात शेतकरी, महिला व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होत जनजागृती रॅली काढली. “आमची जमीन, आमचा हक्क” आणि “शेतकरी एकजूट जिंदाबाद” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
रॅलीदरम्यान आंदोलनकर्त्यांनी गावोगावी फिरून नागरिकांना जमीन अधिग्रहणाच्या संभाव्य परिणामांची माहिती दिली. शेती हीच उपजीविकेचा मुख्य आधार असल्याने जमीन संपादित झाल्यास हजारो कुटुंबांचे भवितव्य धोक्यात येईल, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

आंदोलनात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. हातात फलक घेऊन त्यांनी शासनाकडे शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेण्याची मागणी केली. संबंधित प्रशासनाने शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या संमतीशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
शेतकऱ्यांनी सांगितले की, जमीन आणि उपजीविकेच्या संरक्षणासाठी हा लढा सुरू असून, न्याय मिळेपर्यंत आंदोलन अधिक व्यापक करण्यात येईल. दुसऱ्या दिवशीची जनजागृती रॅली शांततेत पार पडली असून, परिसरातील नागरिकांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

