
शुद्धीकरण यंत्रणा निष्प्रभ, डोजिंग मशीन बंद, कर्मचाऱ्यांची कमतरता; ग्रामस्थांचा संताप, चौकशीची मागणी
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली/चामोर्शी,दि.२६ : केंद्र व राज्य शासनाच्या ‘हर घर जल’ या महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन योजनेवर लखमापूर बोरी येथे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेतून नागरिकांना स्वच्छ पाण्याऐवजी गढूळ, गाळयुक्त आणि दूषित पाणी मिळत असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीपासून गावातील अनेक घरांच्या नळातून चिखलमिश्रित व गढूळ पाणी येत आहे. पाणी पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांना ते वापरणेही धोकादायक ठरत आहे.
“कोट्यवधी रुपये खर्च करूनही जर गढूळ पाणीच मिळणार असेल, तर जल जीवन मिशनचा नेमका उपयोग काय?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
दूषित पाण्यामुळे कॉलरा, अतिसार, कावीळ, टायफॉईड यांसारख्या जलजन्य आजारांचा धोका वाढला असून लहान मुले, वृद्ध आणि महिलांच्या आरोग्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास मोठे आरोग्य संकट निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत अधिकारी एन. कुळसंगे यांनी नियमित स्वच्छ पाणीपुरवठ्याच्या सूचना दिल्याचे सांगितले. तसेच जलशुद्धीकरण टाकीच्या स्वच्छतेसाठी मानधनावर कर्मचारी नियुक्त असल्याचा दावाही त्यांनी केला.
मात्र, पाणीपुरवठा कर्मचारी रमेश बोरीकर यांनी प्रशासनाच्या दाव्यालाच छेद दिला. त्यांनी सांगितले की, गेल्या चार महिन्यांपासून केवळ ५० टक्के वेतन मिळत असून तेही वेळेवर मिळत नाही. शुद्धीकरण टाकीत मोठ्या प्रमाणात गाळ साचतो, डोजिंग मशीन बंद आहे, हेल्पर उपलब्ध नाही आणि दोन कर्मचाऱ्यांचे काम एकट्यालाच करावे लागत आहे. या सर्व कारणांमुळे पाणी शुद्धीकरण प्रक्रियेवर गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एकीकडे शासन प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचल्याचा दावा करत असताना, दुसरीकडे लखमापूर बोरीतील वास्तव पूर्णपणे वेगळे असल्याचे दिसून येत आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही नागरिकांना स्वच्छ पाणी मिळत नसेल, तर योजनेतील त्रुटी, निष्काळजीपणा आणि संबंधित यंत्रणेची जबाबदारी निश्चित करण्याची गरज असल्याची मागणी जोर धरत आहे.
लखमापूर बोरीतील जल जीवन मिशनची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, शुद्धीकरण यंत्रणा दुरुस्त करावी आणि नागरिकांना नियमित स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

