
जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली
चामोर्शी, दि. २६ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा महोत्सव २०२६’ अंतर्गत पाचव्या दिवशी चामोर्शी येथील कर्तव्य कक्ष कार्यालयात रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
“रक्तदानातून जीवनदान, वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धन” या प्रेरणादायी संकल्पनेवर आधारित या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला.

रक्तदान शिबिरात अनेक युवक व नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. एका रक्तदात्यामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते, हा संदेश यावेळी उपस्थितांना देण्यात आला. समाजहितासाठी नियमित रक्तदान करण्याचे आवाहनही करण्यात आले.
यानंतर परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन करण्यात आले.
‘हरित चामोर्शी, हरित गडचिरोली’ या संकल्पनेला बळ देणारा हा उपक्रम ठरला.सेवा महोत्सवाच्या माध्यमातून समाजसेवा, पर्यावरण संरक्षण आणि जनजागृतीचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात येत असून, या उपक्रमाचे नागरिकांकडून सर्वत्र स्वागत होत आहे.

