
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरचीपासून सुमारे ७ किमी अंतरावर असलेल्या टेमली ग्रामपंचायत हद्दीत आज सकाळी एक धक्कादायक अपघात घडला. चंद्रपूरहून छत्तीसगडमधील रायपूर-भिलाईकडे जाणाऱ्या उच्चदाब (हायव्होल्टेज) टॉवर लाईनखाली झाडे व बांबू कटिंगचे काम सुरू असताना एका मजुराला विजेचा करंट लागून तो गंभीर जखमी झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, टेमली येथील मंजूर शिवनंदन घाटघुमर (वय २६) हा मजूर जंगलातील टॉवर पोल परिसरात साफसफाई व झाडतोड करत असताना अचानक त्याला करंट लागला. जोरदार धक्का बसल्याने तो खाली कोसळला. सोबत असलेल्या मजुरांनी आरडाओरडा केल्याने आसपासचे लोक तातडीने घटनास्थळी धावले.

जखमी अवस्थेत त्याला तात्काळ कोरची ग्रामीण रुग्णालयात सकाळी सुमारे ११ वाजता दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरी येथील आस्था खाजगी रुग्णालयात रेफर केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. टेमली व बेडगाव येथील नागरिक तसेच बेडगावचे सरपंच चेतन किरसान व दिलीप कुळसंगे यांनी गंभीर आरोप केला की,
टॉवर लाईनखाली सुरू असलेल्या धोकादायक ट्री-कटिंग कामावेळी पॉवर ग्रिड कंपनीचा एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता
मजुरांच्या भरोशावरच हायव्होल्टेज लाईनखाली काम सुरू होते
गावकऱ्यांनी जखमी मजुराला तात्काळ आर्थिक मदत देण्याची तसेच संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
घटना वेळ : २५ जुलै २०२६, सकाळी १० वाजता
टेमली जंगल, ता. कोरची
मंजूर शिवनंदन घाटघुमर (२६)
हायव्होल्टेज टॉवर लाईनखाली ट्री-कटिंग दरम्यान करंट
सध्या उपचार : ब्रह्मपुरी, आस्था रुग्णालय
एवढ्या धोकादायक कामात सुरक्षा नियमांचे पालन का झाले नाही? अधिकारी गैरहजर का होते?
ही घटना प्रशासन आणि संबंधित कंपनीच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.

