
जिल्हा प्रतिनिधी| गडचिरोली
चामोर्शी,दि.२६ जूलै : गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील भेडांळा परिसरातील १४ गावे आणि गणपूर–जैरामपूर परिसरातील १३ गावांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “शेतकऱ्यांचे प्रश्न – शेतकऱ्यांचा निर्णय!” या भव्य चर्चा सत्राला शेतकरी, पदाधिकारी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेतीसमोरील विविध समस्या, हमीभाव, पीकविमा, सिंचन, कर्जमाफी, वनहक्क आणि शेतकऱ्यांच्या हक्काच्या प्रश्नांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमात अखिल भारतीय आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विक्रांत भुरिया, महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रा. वसंतराव पुरके आणि आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार रामदास मसराम यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांचे प्रश्न केवळ आश्वासनांनी नव्हे, तर ठोस निर्णय आणि प्रभावी अंमलबजावणीद्वारेच मार्गी लावले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विश्वजित कोवासे, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, रवींद्र दरेकर, कुसुमताई आलाम, मनोहर पाटील, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख पवन गेडाम, आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, कुंदा जुवारे, समशेर खान पठाण, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम, माधवराव गावड, श्याम उईके यांच्यासह परिसरातील शेतकरी, विविध गावांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चर्चासत्रात शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी मांडत शासनाकडे विविध मागण्या केल्या. आगामी काळात शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी एकजुटीने लढा उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
२७ गावांच्या शेतकऱ्यांनी एकाच व्यासपीठावर येत शेती आणि शेतकरी हिताच्या प्रश्नांवर एकमुखाने आवाज उठवल्याने हे चर्चा सत्र परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरले.

