
जिल्हा प्रतिनिधी |नितेश गट्टीवार
गडचिरोली | दि. २६ जुलै:
कारगिल युद्धातील अमर शहीदांच्या अद्वितीय शौर्य, त्याग आणि राष्ट्रभक्तीला अभिवादन करत गडचिरोली शहरातील कारगिल चौक येथे २७ वा कारगिल विजय दिवस अत्यंत उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना (जिल्हा गडचिरोली), आजी-माजी सैनिक संघटना आणि कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात वीरमाता, वीरपत्नी, वीरपरिवार आणि माजी सैनिकांचा भावपूर्ण सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात गांधी चौक ते कारगिल चौक दरम्यान काढण्यात आलेल्या भव्य कारगिल विजय रॅलीने झाली. देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर कारगिल स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन व आकर्षक कवायत सादर करत उपस्थितांची मने जिंकली. सहभागी विद्यार्थ्यांना आयोजकांतर्फे नोटबुक वाटप करून प्रोत्साहन देण्यात आले.
वीरपरिवारांचा सन्मान; उपस्थितांकडून उभे राहून अभिवादन
देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी व कुटुंबीयांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. विविध पुरस्कारप्राप्त माजी सैनिकांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात वीरपरिवारांच्या त्यागाला सलाम केला.
“सैनिकांमुळेच देश सुरक्षित” – माजी खासदार डॉ. अशोकजी नेते
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी कारगिल युद्धातील वीर जवानांच्या शौर्याचे स्मरण करून भावनिक मनोगत व्यक्त केले.
ते म्हणाले, “उणे २० अंश तापमानात कारगिलच्या दुर्गम पर्वतरांगांमध्ये भारतीय जवानांनी अदम्य धैर्य, शौर्य आणि पराक्रमाच्या जोरावर शत्रूचा पराभव करून तिरंगा अभिमानाने फडकवला. त्यांच्या बलिदानामुळेच आज प्रत्येक भारतीय सुरक्षित आणि स्वाभिमानाने जीवन जगत आहे. सैनिक हे राष्ट्राचे खरे आधारस्तंभ असून निवृत्तीनंतरही ते समाजसेवा आणि राष्ट्रनिर्मितीत महत्त्वाचे योगदान देत असतात. शहीद जवानांचे बलिदान आणि त्यांच्या कुटुंबीयांचा त्याग देशासाठी सदैव प्रेरणादायी राहील.”
यावेळी त्यांनी भारत-बांगलादेश सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण आलेले कुरखेडा तालुक्यातील मरारटोला येथील जवान सुरेश आंबाडर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या बलिदानाला शतशः नमन केले.
या कार्यक्रमास आमदार डॉ. मिलिंद नरोटे, नगराध्यक्षा अॅड. प्रणोती सागर निंबोरकर, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जीचे प्रतिनिधी कर्नल रामनाथ स्वामी, माजी नगराध्यक्षा योगिता पिपरे, कारगिल स्मारक समितीचे संस्थापक उदय धकाते, शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष होमराज डोनाळकर, कारगिल समितीचे अध्यक्ष ऋषीजी वंजारी, वीरपत्नी सुधा चंदनखेडे, चंदाताई राऊत, घिसुलाल काबरा, चंद्रशेखर भंडागे, आजी-माजी सैनिक, वीरपरिवार, लोकप्रतिनिधी आणि असंख्य देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आयोजक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले. राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत तसेच “वंदे मातरम्”, “भारत माता की जय” आणि “भारतीय सैन्य दल झिंदाबाद”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. कारगिलच्या वीरांना कृतज्ञतेचा सलाम करत कार्यक्रमाची सांगता झाली.

