
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली/चामोर्शी : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
चामोर्शी तालुक्यातील जि. प. उच्च प्राथमिक केंद्र शाळा आमगाव, जि. प. प्राथमिक शाळा जनाळा (तु.), जि. प. प्राथमिक शाळा रखेंगाव, इंडो-जपान प्राथमिक शाळा पडाटोला तसेच जि. प. प्राथमिक शाळा कुदर्शी (टोला) येथील विद्यार्थ्यांना पुस्तके, पेन, कंपास पेटी आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. “विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकं आणि शिक्षणाची नवी उमेद देणे, हेच उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे आहे,” असा संदेश यावेळी तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांनी दिला.

