
गडचिरोली|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली,दि.२४ जूलै : आगामी पदवीधर मतदारसंघ निवडणूक आणि मतदार यादीच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) विशेष पुनरिक्षणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक गडचिरोली येथे उत्साहात पार पडली. आगामी निवडणुकांसाठी पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करण्यासह मतदार नोंदणी आणि सूक्ष्म नियोजनावर बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीत नवीन मतदारांची नोंदणी, मतदार याद्यांतील आवश्यक दुरुस्ती, पात्र मतदारांची नावे सुनिश्चित करणे, पदवीधर मतदारांपर्यंत प्रभावी संपर्क मोहीम राबविणे आणि बूथ स्तरापर्यंत पक्षाची संघटनात्मक यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला. प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने, समन्वयाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करून आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहावे, असे मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी भाजप राष्ट्रीय महामंत्री (अनुसूचित जमाती) तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते, जिल्हा प्रभारी तथा आमदार कीर्तिकुमार बांगडिया, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजप आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष मा.आ. डॉ. देवराव होळी, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोरकर, माजी आमदार डॉ. नामदेवरावजी उसेंडी, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत “सशक्त संघटन, अचूक मतदार नोंदणी आणि प्रभावी नियोजनाच्या बळावर आगामी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भारतीय जनता पक्ष निश्चितच यश संपादन करेल,” असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातील आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात असून, भाजपने निवडणुकीच्या तयारीला वेग दिल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.

