
अमित कत्तीवार|विशेष जिल्हा प्रतिनिधी
एटापल्ली (गडचिरोली): एटापल्ली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आदिनाथ आंधळे हे ३१ जुलै रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत असून, त्यांच्या जागेचा अतिरिक्त कार्यभार देसाईगंज पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी निलेश ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ठाकरे यांच्याकडे यापूर्वीच वडसा (देसाईगंज) आणि अहेरी पंचायत समितीचा कार्यभार असून, आता एटापल्लीचाही समावेश झाल्याने एकाच अधिकाऱ्याकडे तीन पंचायत समित्यांची जबाबदारी आली आहे.
एटापल्ली हा गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम, आदिवासीबहुल व भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण तालुका आहे. अशा तालुक्यात ग्रामीण विकास, मनरेगा, प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, ग्रामपंचायत प्रशासन, महिला व बालविकास तसेच विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पूर्णवेळ अधिकाऱ्याची आवश्यकता असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.

देसाईगंज ते एटापल्ली हे अंतर सुमारे १८० किलोमीटर आहे. या अंतरामुळे तीन पंचायत समित्यांचा प्रशासकीय कारभार, बैठका, योजनांचा आढावा, ग्रामपंचायतींचे मार्गदर्शन आणि नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करणे अतिरिक्त प्रभारी अधिकाऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरणार असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
यापूर्वीही अनेकदा एटापल्ली पंचायत समितीचा कारभार अतिरिक्त प्रभारी अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला होता. त्यामुळे विकासकामांचा वेग कमी होणे, निर्णय प्रक्रियेला विलंब होणे आणि दुर्गम भागातील प्रशासकीय कामांवर परिणाम झाल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
स्थानिक नागरिक व सामाजिक संघटनांनी एटापल्लीसाठी कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नियुक्त करण्याची मागणी केली आहे. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र व पूर्णवेळ अधिकारी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
दरम्यान, एका अधिकाऱ्यावर तीन पंचायत समित्यांचा भार देण्यामागील प्रशासनाची भूमिका काय आहे, तसेच ही व्यवस्था तात्पुरती आहे की कायमस्वरूपी, याबाबत प्रशासनाकडून स्पष्ट भूमिका अपेक्षित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. एटापल्लीसारख्या संवेदनशील व दुर्गम तालुक्याच्या विकासासाठी स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा सक्षम करणे ही काळाची गरज असल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

