
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली,दि.६ जूलै:
गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रासाठी सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालय नागपूरऐवजी गडचिरोली येथेच स्थापन करण्यात यावे, अशी आग्रही मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सन २०११ मध्ये गोंडवाना विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे २१८ संलग्न महाविद्यालयांचा प्रशासकीय कारभार या विद्यापीठामार्फत चालविला जात आहे. मात्र, सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालय अद्याप नागपूर येथे असल्यामुळे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना विविध प्रशासकीय कामांसाठी वारंवार नागपूरला जावे लागते. त्यामुळे वेळेचा अपव्यय, आर्थिक खर्च आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
राज्य शासनाने ज्या धर्तीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासाठी संबंधित कार्यक्षेत्रात सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालयाची स्थापना केली आहे, त्याचप्रमाणे गोंडवाना विद्यापीठाचे मुख्यालय गडचिरोली येथे असल्याने सहसंचालक कार्यालयही गडचिरोली येथेच सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
गोंडवाना विद्यापीठाशी संबंधित बहुतांश शैक्षणिक व प्रशासकीय कामे गडचिरोली येथेच पार पडत असताना केवळ सहसंचालक कार्यालयासाठी नागपूरला जावे लागत असल्याने विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन गोंडवाना विद्यापीठ परिसरात किंवा गडचिरोली शहरात सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालय तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच, ही मागणी तातडीने मान्य न झाल्यास विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व संबंधित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव पंकज गुड्डेवार, माजी नगरसेवक बंडू शनिवारे, नगरसेवक रमेश चौधरी, गटनेते सतीश विधाते, नगरसेवक श्रीकांत देशमुख, नगरसेवक पराग पोरेड्डीवार, नगरसेविका मनीषा खेवले, नगरसेविका मेघा वरगंटीवार, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले तसेच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

