
रस्ते, आरोग्य, पर्यटन व औद्योगिक विकासासह जिंजर हॉटेल उद्घाटनाबाबत निवेदन; विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली,दि. ६ जुलै : गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण व शाश्वत विकासाला अधिक गती देण्यासाठी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेत विविध विकासकामांबाबत सविस्तर निवेदन सादर केले.

या भेटीत जिल्ह्यातील रस्ते विकास, आरोग्य सुविधा, पर्यटन, औद्योगिक गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. जिल्ह्याच्या विकासासाठी प्रलंबित असलेल्या विविध प्रकल्पांना तातडीने गती देण्याची मागणी डॉ. नेते यांनी केली.
निवेदनात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-सी (साकोली–लाखांदूर–वडसा–आरमोरी–गडचिरोली–आष्टी–आलापल्ली–सिरोंचा) या मार्गाचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याबरोबरच नारायणपूर–आलापल्ली (NH-130D) जोडणी मार्गाचे कामही जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील इतर प्रलंबित रस्ते, पूल आणि दळणवळण प्रकल्पांसाठी आवश्यक निधी, प्रशासकीय मंजुरी व वनविभागाच्या परवानग्या त्वरित उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली.
दुर्गम व आदिवासीबहुल भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी अहेरी उपजिल्हा महिला रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका, आवश्यक वैद्यकीय कर्मचारी, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही डॉ. नेते यांनी केली. त्यामुळे दक्षिण गडचिरोलीतील महिला, माता व बालकांना स्थानिक स्तरावर दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यास मोठी मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
याशिवाय, गडचिरोली येथे उभारण्यात आलेल्या टाटा समूहाच्या जिंजर हॉटेलच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ द्यावी, अशी विनंतीही करण्यात आली. हा प्रकल्प जिल्ह्यात पर्यटन, उद्योग, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला चालना देणारा महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास डॉ. नेते यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. नेते यांनी मांडलेल्या सर्व मागण्या गांभीर्याने ऐकून घेत संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून विकासकामांना आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी सकारात्मक भूमिका त्यांनी व्यक्त केली.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे तसेच ॶॅड. संदीप धाईत उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. अशोक नेते म्हणाले, “गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असलेला प्रत्येक प्रश्न शासनाच्या निदर्शनास सातत्याने आणून तो मार्गी लावण्यासाठी माझा प्रयत्न कायम राहील. रस्ते, आरोग्य, पर्यटन, उद्योग आणि रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून गडचिरोलीला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल.”
गडचिरोलीच्या विकासाला चालना देणारी ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात असून, विविध प्रलंबित विकासकामांना यामुळे लवकरच गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

