
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली,दि.७ जूलै:गडचिरोली जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या बसेसची दयनीय अवस्था पाहता मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे. “आम्हाला एअरपोर्ट नको, आधी सुरक्षित बसेस द्या,” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली.
नुकत्याच घडलेल्या एका घटनेत धावत्या एसटी बसचा मागील भाग तुटून पडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या प्रकारामुळे जिल्ह्यातील एसटी बसेसच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यातील नागरिकांनी अनेक वेळा निवेदने, आंदोलने आणि मोर्चांच्या माध्यमातून नवीन व सुरक्षित एसटी बसेसची मागणी केली आहे. मात्र, या मागणीकडे शासनाकडून अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले गेलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आजही जीर्ण आणि धोकादायक बसेसमधून प्रवास करावा लागत आहे.
दरम्यान, जिल्ह्यात विमानतळ उभारण्याच्या प्रस्तावावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सर्वसामान्य नागरिकांसाठी मूलभूत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याऐवजी विमानतळासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी अधिग्रहित करण्याचा विचार केला जात असल्याची टीका त्यांनी केली.
गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात सुरक्षित, आधुनिक आणि पुरेशा संख्येने एसटी बसेस उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे सांगत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन जिल्ह्यासाठी नवीन बसेस मंजूर कराव्यात, अशी मागणी महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.

